अजनी पोलिसांच्या कोठडीतून पळालेला आरोपी जाळ्यात


नागपूर : अजनी पोलीस ठाण्याच्या कोठडीतून पळालेला आरोपी निखील चैतराम नंदनकर (वय 27, रा. भांडेवाडी) यास गुन्हे शाखेच्या युनिट चारमधील पथकाने अटक केली आहे. अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याच्या आरोपात तीन दिवसांपूर्वी आरोपी निखीलला पोलिसांनी अटक केली होती. त्याला अजनी ठाण्यातील लॉकमध्ये (कोठडी) टाकण्यात आले होते. घाईगडबडीत पोलिसांनी लॉकअप रूमला कुलूप न लावल्याची संधी साधून आरोपी निखील पोलीस ठाण्यातून पळून गेला. या घटनेमुळे अजनी पोलीस ठाण्याच्या कारभाराचे चांगलेच वाभाडे निघाले होते. दरम्यान, अजनी पोलिसांसोबतच गुन्हे शाखेचेही पोलीस निखीलचा शोध घेत होते. अखेर तो शनिवारी ग्रेट नाग रोडवरील जगदंबा सभागृहाजवळ येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून गुन्हेशाखेच्या युनिट चारमधील पोलिसांनी सापळा लावला. तो सायंकाळी 5 च्या सुमारास सभागृहाजवळ दिसताच पोलिसांनी त्याला जेरबंद करून अजनी पोलिसांच्या हवाली केले.


कॉपी करू नका.