बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजूर महिलेचा मृत्यू

मध्यप्रदेशातील पानसेमल तालुक्यात जुनपाणी शिवारातील घटना
शहादा : शेतात चारा कापणीचे काम करणार्या शेतमजूर महिलेवर बिबट्याने हल्ला चढवल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी चार वाजता घडली. या घटनेत बेरीबाई कांतीलाल भील (45) या महिलेचा मृत्यू झाला. या घटनेने शेतमजुरांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाच्या भूमिकेविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे.
अचानक चढवला हल्ला
मध्यप्रदेश सीमेलगत पानसेमल तालुक्यातील जुनापाणी शिवारात रवींद्र रंगराव पाटील यांच्या शेतात बेरीबाई या चारा कापत असताना शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला चढवत महिलेला दूरपर्यंत ओढून नेत तिचे लचके तोडल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. मृत महिलेच्या पतीसह आजूबाजच्या लोकांनी पडलेल्या रक्ताच्या थेंबावरून शोधाशोध करीत बिबट्याला हुसकावून लावले मात्र तोपर्यंत महिलेचा मृत्यू झाला. वनक्षेत्रपाल मंगेश बुंदेला यांनी आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी धाव घेतली. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. वनविभागाने चार ते पाच पिंजरे लावले असून आणखी बडवाणी येथून पाच सहा पिंजरे मागविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
