शिंदखेड्यातील दुचाकी चोरटे पोलिसांच्या जाळ्यात
चोरीच्या सात दुचाकी जप्त ; निरीक्षक दुर्गेश तिवारी यांची धडाकेबाज कामगिरी
शिंदखेडा : शहरासह परीसरातून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्यानंतर पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी गस्त वाढवण्यासह विविध पथकांची निर्मिती केली होती. पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर शहरातील दोघा संशयीतांच्या मुसक्या आवळल्यानंतर त्यांच्याकडून चार लाख रुपये किंमतीच्या तब्बल सात चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. या कारवाईमुळे शिंदखेडा परीसरातील नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ज्या नागरीकांच्या दुचाकी चोरीस गेल्या आहेत त्यांनी मूळ कागदपत्रासह पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गोपनीय माहितीवरून आवळल्या मुसक्या
शिंदखेडा पोलिसांनी अनिल जगन पिंपळे (भील) व अजय विजय हजारे (शिंदखेडा) यांच्या गोपनीय माहितीवरून मुसक्या आवळल्या. ही कारवाई धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.विश्वास पांढरे, अपर पोलिस अधीक्षक राजू भुजबळ, उपअधीक्षक अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी, मैनुद्दीन हबीब सैय्यद, सायसिंग पावरा, गीतांजली सानप, मिलिंद सोनवणे, रफिक मुल्ला, एकलाख पठाण, बिपीन पाटील, मयुर थोरात, हर्षल चौधरी, मनोज दाभाडे, आबा भील, ललितकुमार काळे, सुशीलकुमार गांगुर्डे, गोपाळ माळी, मोहन सूर्यवंशी, विजय पाटील, कैलास महाजन आदींच्या पथकाने केली.