24 वर्षीय तरुणीचा लग्नाला नकार ; संतप्त तरुणाने एचआयव्ही संक्रमित इंजेक्शन टोचले
24-Year-Old Woman Refuses Marriage ; Enraged Man Injects Her with HIV-Infected Syringe हैदराबाद (12 एप्रिल 2026) : 24 वर्षीय तरुणीने लग्नाला नकार दिल्यानंतर संतप्त तरुणाने तरुणीला एचआयव्ही संक्रमित इंजेक्शन टोचल्याचा प्रकार तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये घडला. या घटनेनंतर तरुणीने घरामध्ये गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्याने खळबळ उडाली आहे.
काय घडले तरुणीसोबत?
आरोपी मनोहर आणि पीडित तरुणी हे एकमेकांचे नातेवाईक होते. सुरुवातीला त्यांचे लग्न ठरले होते मात्र मनोहरचे आई-वडील एचआयव्ही बाधित असल्याचे समजल्यानंतर तरुणीच्या पालकांनी गतवर्षी सप्टेंबरमध्ये मनोहरची एचआयव्ही चाचणी केली. त्या चाचणीत मनोहर देखील ’एचआयव्ही पॉझिटिव्ह’ असल्याचे आढळून आले. हे समजताच तरुणीने तात्काळ लग्नास नकार दिला आणि जमलेली सोयरीक तोडली.
लग्नास नकार दिल्याने मनोहर संतापला होता. त्याने 11 मार्च रोजी तरुणीच्या घरात घुसून तिला जबरदस्तीने स्वतःचे एचआयव्ही संक्रमित रक्ताचे इंजेक्शन टोचले. या धक्कादायक प्रकारानंतर तरुणीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी त्यावेळी मनोहरला हत्येच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली अटक केली होती.
मानसिक तणावातून संपवली जीवनयात्रा
या घटनेला एक महिना उलटल्यानंतर, पीडित तरुणी आपल्या घरात मृतावस्थेत आढळली. तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिला एचआयव्ही संसर्ग झाला असण्याची भीती, सामाजिक बदनामीची धास्ती आणि या भयानक अनुभवामुळे ती प्रचंड मानसिक तणावात होती. कुटुंबियांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.


