नाशिकमधील धर्मांतर रॅकेटची निदा खान ‘मास्टरमाइंड’ ; सुरक्षेसाठी कर्मचार्यांचे आता ‘वर्क फ्रॉम होम’
Nida Khan Identified as ‘Mastermind’ Behind Nashik Conversion Racket; Employees Now Working from Home for Safety नाशिक (16 एप्रिल 2026) : नाशिकच्या नामांकीत आयटी कंपनीत महिला कर्मचार्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, निदा खान हीच धर्मांतर रॅकेटची मास्टरमाइंड असून गेल्या 20 दिवसांपासून ती पसार असल्याने तिचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, कंपनीतील 150 कर्मचार्यांना आता वर्क फ्रॉम होम देण्यात आले आहे.
150 कर्मचार्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ चे आदेश
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कंपनीच्या दिल्लीतील मुख्य कार्यालयाने चौकशीची चक्रे फिरवली आहेत. वरिष्ठ अधिकार्यांच्या पथकाकडून कंपनीची ‘झाडाझडती’ सुरू आहे. तपासाच्या काळात कामकाजात अडथळा येऊ नये आणि कर्मचार्यांच्या सुरक्षेसाठी 150 कर्मचार्यांना सोमवारपासून ‘वर्क फ्रॉम होम’ कामकाज करण्याचे आदेश देण्यात आले.
तपासादरम्यान कंपनीत शुकशुकाट
कामगार उपायुक्त कार्यालयाचे पथक जेव्हा चौकशीसाठी कंपनीत पोहोचले, तेव्हा त्यांना तेथे एकही कर्मचारी आढळला नाही. प्रशासनाने शॉप अॅक्ट लायसन्स आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी करून काही कागदपत्रे जप्त केली आहेत. अंतर्गत चौकशीत कर्मचार्यांचे जबाब नोंदवले जात असून, त्यात अनेक गंभीर तक्रारी समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
निदा खान धर्मांतर रॅकेटची ’मास्टरमाइंड’
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, निदा खान ही ऑपरेशन डिपार्टमेंटमध्ये मॅनेजर आणि टीम लीडर म्हणून कार्यरत होती. दररोजच्या कामाच्या मीटिंगमध्ये हिंदू मुलींना लक्ष्य केले जात असे. कामाचे नियोजन देण्याच्या बहाण्याने मुलींवर धर्मांतरासाठी दबाव टाकला जात असे. ज्या महिलांनी विरोध केला, त्यांचा मानसिक आणि लैंगिक छळ करण्यासाठी निदा खान चिथावणी देत असल्याचे तपासात उघड झाले. हे सर्व कृत्य एका विशिष्ट व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून हाताळले जात होते, ज्यामुळे यात आंतरराष्ट्रीय रॅकेट सक्रिय असल्याचा संशय बळावला आहे.
निदा खानच्या शोधासाठी तीन पथके रवाना
मुंबई नाका आणि देवळाली पोलीस ठाण्यात याप्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे, ज्यात कंपनीची एच.आर. अश्विनी चैनानी हिचाही समावेश आहे. अश्विनीच्या चौकशीतूनच निदा खानच्या मुख्य भूमिकेचा खुलासा झाला आहे. निदा खानच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके रवाना करण्यात आली आहेत.
कंपनीपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आज मोर्चा
नाशिक शहरात आज सकल हिंदू समाजाच्या वतीने मोठ्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. कंपनीपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये विविध हिंदू संघटनांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग अपेक्षित आहे. धर्मांतराच्या आरोपांबाबत तसेच महिला कर्मचार्यांवर झालेल्या कथित अत्याचारांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणाची दखल राष्ट्रीय महिला आयोगानेही घेतली असून 18 एप्रिल रोजी आयोगाचे पथक नाशिकमध्ये येणार आहे.


