गोळीबारानंतर बँक कर्मचार्यांना ओलीस ठेवत 15 कोटींचे सोने लूटले
एमपीत बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सशस्त्र दरोडा : व्यवस्थापकाला मारहाण ; आरोपींची छायाचित्रे समोर
After opening fire, robbers held bank employees hostage and looted gold worth ₹15 crore. सिंगरौली (18 एप्रिल 2026) : एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला साजेशी ठरावी अशी घटना मध्य प्रदेशातील सिंगरौली येथे घडली. शस्त्रांच्या धाकावर पाच दरोडेखोरांनी बैढण येथील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये दरोडा टाकत तब्बल दहा किलो सोने व 20 लाखांची रोकड लुटून पोबारा केला. सोन्याची किंमत सुमारे 15 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी एक वाजता घडली.
अवघ्या काही क्षणात दरोडा
मिळालेल्या माहितीनुसार, लुटलेले सोने ग्राहकांचे होते, जे बँकेने गहाण ठेवून कर्ज दिले होते. सोने एकाच लॉकरमध्ये ठेवले होते, ज्याला दरोडेखोरांनी लक्ष्य केले. आरोपी पिट्ठू बॅगसोबत एक मोठी कापडी पिशवी घेऊन आले होते. त्यातच सर्व माल भरून ते पळून गेले. प्रत्यक्षदर्शी आशिष पांडे यांनी सांगितले की, जेव्हा ते त्यांच्या पत्नीसोबत बँकेत काम करत होते, तेव्हा अचानक दोन सशस्त्र दरोडेखोर आत घुसले. त्यांनी तात्काळ बँक कर्मचार्यांना ओलीस ठेवले.

त्यानंतर काही मिनिटांतच आणखी तीन सशस्त्र साथीदार आत पोहोचले. त्यांनी संपूर्ण बँकेवर ताबा मिळवला. दरोडेखोरांनी तेथे उपस्थित असलेल्या ग्राहक आणि कर्मचार्यांवर बंदुका रोखताच बँक परिसरात आरडाओरडा सुरू झाला.
मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार डीजीपी घटनास्थळी पोहोचले
मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या निर्देशानुसार रात्री सुमारे 10.45 वाजता डीजीपी कैलाश मकवाना सिंगरौली येथे पोहोचले. त्यापूर्वी रीवा रेंजचे आयजी साकेत प्रसाद पांडे घटनास्थळी पोहोचले होते. त्यांच्यासोबत रीवा येथून फॉरेन्सिक टीमही तपासणीसाठी आली.
व्यवस्थापकावर बंदुकीच्या दस्त्याने हल्ला
एसपी मनीष खत्री यांच्या माहितीनुसार, दरोडेखोरांनी बँक व्यवस्थापकाकडे रोख रकमेच्या चाव्या आणि रोख रकमेची माहिती मागितली. जेव्हा व्यवस्थापकाने टाळाटाळ केली, तेव्हा त्याला बेदम मारहाण केली. बंदुकीच्या दस्त्याने त्याच्या डोक्यावर वार केला. सुमारे 15 मिनिटे बँकेत जोरदार धुमाकूळ घातला. शेवटी रोख रक्कम आणि दागिन्यांनी भरलेली पिशवी घेऊन पळून गेले.
घटनेची माहिती मिळताच सिंगरौलीचे एसपी मनीष खत्री आपल्या पथकासह स्वतः घटनास्थळी पोहोचले. शहरातील सर्व बाहेर पडण्याचे मार्ग सील करण्यात आले आहेत. बँक आणि आजूबाजूच्या रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. एसपींनी सांगितले की, सुमारे 14.50 लाख रुपये कालचे ठेवलेले होते. बाकी आजचे त्यावेळेपर्यंतचे कलेक्शन होते. याव्यतिरिक्त सोने-चांदी होते.
एसपी म्हणाले- कर्मचारी आणि ग्राहकांना ओलीस ठेवले
एसपी मनीष खत्री यांनी सांगितले की, तपासात असे समोर आले आहे की, हेल्मेट घातलेल्या दरोडेखोराने बँक मॅनेजरला मारहाण केली. इतर बँक कर्मचारी आणि उपस्थित ग्राहकांना एका ठिकाणी बसवून ओलीस ठेवले. त्यानंतर जबरदस्तीने लॉकर उघडवून सोने आणि रोख रक्कम घेऊन पळून गेले.

