भोंदू अशोक खरातच्या अडचणी कायम : पाचव्या गुन्ह्यात पोलीस कोठडी


Conman Ashok Kharat’s Troubles Persist: Police Custody in Fifth Case नाशिक (19 एप्रिल 2026) : नाशिकमधील भोंदू अशोक खरातचा पोलीस कोठडीतील मुक्काम आता अधिक लांबला आहे. शनिवारी चौथ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर रविवार, 19 रोजी एसआयटी’ने त्याला पाचव्या गुन्ह्यात अटक करून न्यायालयासमोर उभे केल्यानंतर युक्तीवादानंतर न्यायालयाने अशोक खरातला 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

भोंदूविरोधात 15 गुन्हे : अडचणी वाढल्या
अशोक खरातवर आतापर्यंत एकूण 15 गुन्हे दाखल झाले असून त्याच्या पापाचा पाढा वाचताना पोलिसही चक्रावून गेले आहेत. यातील 8 गुन्हे हे थेट महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे आहेत, तर उर्वरित 7 गुन्हे खंडणी, बेकायदेशीर सावकारी आणि फसवणुकीशी संबंधित आहेत. एका बाजूला पोलिस कोठडीतून सुटका होत नाही, तर दुसरीकडे अंमलबजावणी संचालनालयाने (एऊ) खरातच्या 100 कोटींहून अधिक मालमत्तेची आणि आर्थिक साम्राज्याची मुळे खणून काढण्यास सुरुवात केल्याने त्याच्या अडचणीत दुपटीने वाढ झाली आहे.


कोर्टात काय घडले?
अशोक खरात याला पाचव्या गुन्ह्यासाठी कोर्टासमोर हजर केले होते. आजची ही महत्त्वाची सुनावणी सुरक्षेच्या कारणास्तव ’व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे पार पडली. यावेळी सरकारी वकिलांनी कोठडीची गरज स्पष्ट करताना महत्त्वाचा मुद्दा मांडला. आरोपीची पद्धत एकच असली, तरी प्रत्येक पीडित महिला वेगळी आहे. महिलांना गुंगीचे पदार्थ देऊन त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले आहेत. ते द्रव्य कुठून आणले आणि यामागे कोणाचे मोठे षडयंत्र आहे का, याचा सखोल तपास करण्यासाठी आरोपीची कोठडी आवश्यक आहे, असा युक्तिवाद सरकार पक्षातर्फे करण्यात आला.

दुसरीकडे, आरोपीच्या वकिलांनी ही मागणी खोडून काढताना सांगितले की, पोलीस तेच जुने मुद्दे मांडून पुन्हा पुन्हा कोठडी मागत आहेत. द्रव्य कुठून आणले आणि इतर बाबींचा तपास आधीच झाला असल्याने पुन्हा कोठडीची गरज नाही मात्र गुन्ह्याचे गांभीर्य आणि पीडितांची वाढती संख्या विचारात घेऊन न्यायालयाने आरोपीला 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

अद्याप 11 गुन्ह्यांची चौकशी बाकी
आतापर्यंत अशोक खरातच्या केवळ चार गुन्ह्यांचा प्राथमिक तपास पूर्ण झाला आहे. उर्वरित 11 गुन्ह्यांमध्ये अद्याप त्याची सखोल चौकशी होणे बाकी आहे. सरकारवाडा पोलिसात दाखल पाचव्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात त्याला आता पोलिस प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत. एसआयटीने खरातच्या विरोधात भक्कम पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली असून, येत्या काही दिवसांत या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांचे मोठे दुवे समोर येण्याची शक्यता आहे.े





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !