चोपडा हादरले : 32 वर्षीय तरुणाची वादातून हत्या ; एकाला अटक
Chopda Shaken : 32-Year-Old Man Murdered Following Dispute ; One Arrested चोपडा (21 एप्रिल 2026) : शहरातील 32 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आल्याने शहरासह परिसरात खळबळ उडाली. प्रदीप राजेंद्र माळी (32) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. पानटपरी जाळल्याच्या वादातून हा प्रकार घडल्याचा संशय आहे. या प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, सोमवारी सकाळी आठ वाजता मृतदेह आढळल्यानंतर ओळख पटवणे कठीण ठरत असतानाच नातेवाईकांनी कपडे, हातावरील टॅटू व खिशात सापडलेल्या लग्नपत्रिकेवरून ओळख पटवली. यावेळी नातेवाईकांनी मन हेलावणारा आक्रोश केला.

काय घडले चोपडा शहरात ?
मृत प्रदीप माळी हा हमालीचे काम करत होता. तो रविवारी रात्री 9 वाजेपासून बेपत्ता होता. तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर रात्री 9 वाजून 3 मिनिटांनी प्रदीप माळी, विजय वैदकर आणि निर्मल बडगुजर हे दुचाकीवरून दगडाने ठेचून जाताना दिसून आल्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे गतिमान केली.
पानटपरी जाळल्याचा वाद
13 मार्च रोजी संशयित चेतन कानडे याने प्रदीपची पानटपरी जाळली व त्यानंतर त्यांच्यात वाद झाला होता. या जुन्या वादातूनच हा खून झाल्याचा संशय आहे. पोलिसांनी चेतन सुभाष कानडे (रा. पाटील गढी) याला धानोरा गावाजवळ ताब्यात घेतले असून उर्वरित दोन आरोपींच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेची टीम रवाना झाली आरोपी पोलिसांच्या नजरेत असल्याचे समजते. अधिक तपास पोलीस निरीक्षक पवन देसले व सहकारी करीत आहेत.


