भुसावळातील दुकानांसह कार्यालय, आस्थापनांच्या फलकांवर मराठी पाट्या न लागल्यास मनसेचे ‘खळ खट्याक’ आंदोलन
MNS Threatens ‘Khal Khatyak’ Agitation in Bhusawal If Marathi Signboards Are Not Displayed on Shops, Offices, and Establishments. भुसावळ (21 एप्रिल 2026) : भुसावळ शहरातील दुकाने, कार्यालय आणि आस्थापनांच्या नाम फलकावर मराठी (देवनागरी लिपी) भाषेचा वापर शासन निर्णयानुसार करावा अन्यथा अशा आस्थापनांवर कारवाई करावी, अशी मागणी मनसेतर्फे मुख्याधिकारी राजेंद्र फातले व नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांच्याकडे करण्यात आली.
कायद्याची व्हावी अंमलबजावणी
कायद्यांनुसार महाराष्ट्रातील सर्व दुकाने, आस्थापना, कार्यालये, हॉटेल, रेस्टॉरंट, आणि खाजगी कंपन्यांच्या नामफलकांवर मराठी भाषेत (देवनागरी लिपी) नाव असणे बंधनकारक आहे. ामफलकावरील मराठी भाषेतील अक्षरे ही इतर भाषेतील अक्षरांपेक्षा मोठी आणि सुरुवातीला ठळकपणे असणे आवश्यक आहे. इंग्रजी नाव लिहायचे असल्यास, ते मराठी नावाच्या खाली किंवा बाजूला लहान आकारात लिहिता येते मात्र शहरात या नियमांची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही.

तर पालिका करणार कारवाई
भुसावळ शहरातील ज्या दुकान, आस्थापना, हॉटेल, कार्यालयावरील
नामफलकावर मराठी भाषेचा वापर केला नसेल किंवा तो चुकीच्या पद्धतीने लहान अक्षरात लावला असेल तर संबंधित दुकानाचा, आस्थापनेचा परवाना रद्द करावा व दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांनी कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी दिले. दरम्यान, अंमलबजावणी न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
मनसे भुसावळ शहराध्यक्ष दीपक सोनवणे यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले. निवदेन देताना मनसे जिल्हा उपाध्यक्ष विनोद पाठक, तालुकाध्यक्ष तुषार वाढे, तालुका उपाध्यक्ष दशरथ सपकाळे, तालुका सचिव विलास कोळी, सुशील मोरे आदी उपस्थित होते.

