28 हजारांची लाच भोवली : धुळे कृषी कार्यालयाचा पर्यवेक्षक एसीबीच्या जाळ्यात
गणेश वाघ
Bribe of ₹28,000 Proves Costly : Dhule Agriculture Office Supervisor Caught in ACB Trap धुळे (22 एप्रिल 2026) : ठिबक साहित्याची मोका जोडणी करून त्याची फाईल मंडळ कार्यालयास पाठवल्याच्या मोबदल्यात 28 हजारांची लाच मागून ती स्वीकारताना धुळे तालुक्यातील पिंप्री तालुका कृषी कार्यालयाचे पर्यवेक्षक कैलास रामदास तेले (अक्षय कॉलनी, गोंदूर रोड, धुळे) यांना धुळे एसीबीने मंगळवारी सायंकाळी उशिरा अटक केली. या कारवाईने कृषी विभागातील लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे.
असे आहे लाच प्रकरण
तक्रारदाराचे नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा येथे ठिबक सिंचन साहित्य विक्रीचे रजिस्टर्ड दुकान आहे शिवाय शिरूर, ता.धुळे येथेदेखील शाखा आहे. शिरूडच्या दुकानातून परिसरातील शेतकरी शासकीय योजनेतून ठिबक सिंचन साहित्याची खरेदी करतात व या ठिबक योजनेचे शासकीय अनुदान मिळण्यासाठी डीबीटी पोर्टलवर शेतकरी ऑनलाईन अर्ज करतात. सिंचन साहित्य खरेदी केलेल्या शेतकर्याच्या शेतात जावून साहित्याची जोडणी केल्याची पडताळणी (मोका तपासणी) करण्याचे काम पर्यवेक्षक कैलास तेले यांच्याकडे आहे. ही पडताळणी करून संबंधित फाईल मंडळाधिकार्याकडे लॉगईनसाठी पाठवल्यानंतर पर्यवेक्षक तेले यांनी तक्रारदाराच्या दुकानात येत मोका तपासणी केल्याच्या मोबदल्यात 28 हजारांची लाच मागितली मात्र तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी 21 रोजी धुळे एसीबीकडे प्रत्यक्ष लेखी तक्रार दिल्यानंतर पडताळणीनंतर सापळा रचण्यात आला.

धुळ्यात रचला सापळा
धुळ्यातील जयहिंद चौकात तक्रारदाराला लाच रक्कम देण्यासाठी कृषी पर्यवेक्षक तेले यांनी बोलावल्यानंतर पथकाने सापळा रचला. मंगळवारी सायंकाळी उशिरा तक्रारदाराकडून लाच स्वीकारताच आरोपीला अटक करण्यात आली.
यांनी केला सापळा यशस्वी
धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रवीण मोरे, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, सागर शिर्के, प्रीतेश चौधरी, चंद्रकांत सैंदाणे, रेशमा परदेशी हवालदार सुधीर मोरे, जगदीश बडगुजर आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.

