वाल्मीक कराड गँगची तुरूंगातही दहशत : कैद्याला मारहाण ; ऑडीओ क्लीप व्हायरल
Valmik Karad Gang बीड (22 एप्रिल 2026) : सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले व त्याचा सहकारी प्रतीक घुले या दोघांनी बीड जिल्हा कारागृहात एका कैद्याला जबर मारहाण केल्याची बाब समोर आली असून घटनेची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात पीडित व्यक्ती या दोघांच्या मारहाणीमुळे आपले वरचे हाड बाहेर आल्याचा दावा करताना ऐकू येत आहे. या घटनेमुळे वाल्मीक कराड गँगची तुरुंगातही मोठी दहशत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
काय घडले तुरूंगात ?
अजहर अब्दुल रहमान पठाण असे मारहाण झालेल्या कैद्याचे नाव आहे. त्याला सुदर्शन घुले, प्रतीक घुले व शंकर शेप नामक अन्य एका कैद्याने मारहाण केल्याचा आरोप आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, या कैद्यांत जेलमधील बराकीतील बसण्याच्या जागेवरून वाद झाला. त्यातून सुदर्शन घुले, प्रतीक घुले व शंकर शेप या तिघांनी अजहर पठाणला बेदम मारहाण केली. या घटनेनंतर कैद्यांत शाब्दिक चकमक झाल्याचीही माहिती आहे. स्वतः पीडित कैद्याने आपल्या नातेवाईकांना या घटनेची माहिती दिली. त्यांच्यातील फोन कॉलची क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाली असून ‘दिव्य मराठी’ ने या संदर्भात ऑनलाईन वृत्त दिले आहे.

काय आहे व्हायरल क्लिपमध्ये?
अजहर पठाण व्हायरल क्लिपमध्ये सांगतो, तुरुंगातील पोलिस माझे ऐकत नाहीत. ते त्यांच्याशी मिळाले आहेत. त्यांनी पैसे घेतलेत त्यामुळे ते मला न्याय देत नाहीत. मी जेलरला सांगितले पण तो ही त्यांचाच माणूस आहे. पहिला जेलर चांगला होता. त्याची यांनीच बदली केली. चांदणे साहेबांना सुपरिटेंडेंट यांनीच केले. ते माझे ऐकत नाहीत. उलट मलाच धमक्या देत आहेत. तुझी जेल बदली करू असे सांगत आहेत. माझ्या घरच्या लोकांना फोन करून धमक्याही देत आहेत. आमचे कुणी काही वाकडे करू शकत नाही. तुझा संतोष देशमुख करून टाकील असे म्हणत आहेत. ब्रेकींग महाराष्ट्र या ऑडीओ क्लीपची पुष्टी करीत नाही.
कारागृह अधीक्षकांचे कानावर हात
कारागृह अधीक्षक रामराजे चांदणे यांना छेडले असता त्यांनी कारागृहात काही कैद्यांत बाचाबाची झाल्याचे मान्य केले. तुरुंगात काही कैद्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. हे सर्व कैदी सहा नंबरच्या बराकीत होते. त्यांच्यात किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. या प्रकरणी दोन्ही कैद्यांनी एकमेकांच्या विरोधात तक्रार केली नाही. त्यांनी तसे लेखी दिले आहे पण मारहाणीसारखा कोणताही प्रकार तुरुंगात घडला नाही, असे ते म्हणाले.
शिवसेनेची कठोर कारवाईची मागणी
सत्ताधारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख स्वप्नील गलधर यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. प्रस्तुत प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. विशेषतः सुदर्शन घुले व संतोष देशमुख हत्याकांडातील इतर आरोपींना इतर तुरुंगात हलवण्यात यावे. त्यांचे तुरुंगातही जंगलराज सुरू आहे. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, असे ते म्हणालेत.

