पत्त्याच्या क्लबवर कारवाई न करण्यासाठी पाच हजारांची लाच घेताना हवालदार एसीबीच्या जाळ्यात
गणेश वाघ
Police Constable Caught by ACB While Accepting ₹5,000 Bribe to Avoid Taking Action Against Card Club अहिल्यानगर (24 एप्रिल 2026) : पत्त्याच्या क्लबवर कारवाई न करण्यासाठी पाच हजारांची लाच मागून ती स्वीकारताना मिरजगाव स्टेशन, ता.कर्जत येथील हवालदार दीपक सर्जेराव पवार (39) यास अहिल्यानगर एसीबीने अटक केली आहे. या कारवाईने पोलीस वर्तुळातील लाचखोर हादरले आहेत.
असे आहे लाच प्रकरण
तक्रारदाराचा मिरवगाव येथे पत्त्याचा क्लब असून हा क्लब सुरळीत चालू राहू देण्यासाठी तसेच कुठलीही पोलीस कारवाई न करण्यासाठी दर महिन्याला पाच हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी हवालदार दीपक पवार यांनी केली होती. तक्रारदाराने या संदर्भात प्रत्यक्ष अहिल्यानगर येथे एसीबीकडे संपर्क साधत तक्रार दिल्यानंतर मिरजगाव पोलीस ठाण्यात लाच पडताळणी करून सापळा रचण्यात आला.

आरोपी हवालदाराने मिरजगावच्या क्रांती चौकातील नटराज ज्यूस सेंटरमध्ये लाच रक्कम देण्यासाठी तक्रारदाराला बोलावल्यानंतर लाच स्वीकारताच दबा धरून असलेल्या पथकाने आरोपीला अटक केली.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपूटे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संतोष शिंदे, रवींद्र निमसे, बाळासाहेब कराड, चालक हारुन शेख आदींच्या पथकाने केली.
