भुसावळ नगराध्यक्षा गायत्री गौर-भंगाळेंचा जातीचा दाखला अवैध

जळगाव जातपडताळणी समितीचा निर्णय : उच्च न्यायालयात याचिका दाखल करता येणार ; आगामी काळात भुसावळचे राजकीय वातावरण ढवळून निघणार !


गणेश आर.वाघ

Bhusawal Municipal Council President Gayatri Gaur-Bhangale’s Caste Certificate Declared Invalid भुसावळ (25 एप्रिल 2026) : भुसावळ नगराध्यक्षा गायत्री गौर-भंगाळे यांच्या जातप्रमाणपत्राबाबत तक्रारी दाखल करण्यात आल्यानंतर त्याची समितीकडून चौकशी सुरू करण्यात आली होती. जळगाव जात पडताळणी समितीने गायत्री भंगाळे यांनी दिलेला अनुसूचित जातीचा जातीचा दाखला गुरुवार, 23 एप्रिल रोजी अवैध ठरवल्याने भुसावळच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या निर्णयाविरोधात त्यांना न्यायालयात याचिका दाखल करता येणार असून हा निर्णय शहरातील सत्ताधार्‍यांना मोठा धक्का मानला जात आहे.

जात प्रमाणपत्र रद्द करीत केले सरकारजमा
जळगाव जात पडताळणी समितीचे अध्यक्ष नयना बोंदार्डे, सदस्य आर.आर.महाजन व एन.एस.रावते यांनी गुरुवारी काढलेल्या आदेशानुसार भुसावळ प्रांताधिकार्‍यांनी चुकीच्या कागदपत्रांच्या आधारावर जातप्रमाणपत्र दिल्याचे समितीने आदेशात नमूद केले आहे. प्रांतांनी दिलेले अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र एकमताने रद्द करण्यात आल्याचे आदेशात नमूद आहे. प्रांतांविरोधात अधिनियम 2000 चे कलम 13 अन्वये योग्य ती कारवाई करण्याबाबत जळगाव जिल्हाधिकार्‍यांना सूचित करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी बजावणार नोटीस
जिल्हाधिकारी भंगाळे यांना नोटीस बजावतील. जातीचा दाखला किंवा पडताळणी नसल्यामुळे जिल्हाधिकारी तक्रार अर्जावरुन किंवा सुमोटो घेवून त्यांना अपात्र करू शकतील. या निर्णयावर भंगाळे अपिलात जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, संजय भागवत तायडे, राहुल वसंत तायडे, रजनी संजय सावकारे व प्रमोद वामन सावकारे आदींनी अनुसूचित जाती जात पडताळणी समिती, जळगाव यांच्याकडे तक्रार केली होती. नगराध्यक्षांचा जातीचा दाखला अवैध ठरवण्यात आल्यानंतर आगामी काळात शहरातील राजकीय वर्तुळात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आदेशाची प्रत अद्याप प्राप्त झाली नसल्याचे नगराध्यक्षांचे पती चेतन भंगाळे यांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !