नंदुरबार गुन्हे शाखेची मोठी कारवाई : 28 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त ; राजस्थानचा आरोपी जाळ्यात
Major Operation by Nandurbar Crime Branch: Illegal Liquor Stock Worth ₹28 Lakhs Seized; Accused from Rajasthan Nabbed नंदुरबार (25 एप्रिल 2026) : अवैधरित्या विदेशी दारुची वाहतूक करताना नंदुरबार गुन्हे शाखेने तब्बल 28 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त केला आहे. या कारवाईने अवैधरित्या मद्याची वाहतूक करणार्या तस्करांच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी राजस्थान राज्यातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना शुक्रवार, 24 रोजी गुप्त बातमीदारामार्फत एका पांढर्या रंगाच्या पिकअप वाहन (क्रमांक एम.एच.14 जी.डी.7497) मधून अवैधरित्या विदेशी दारूची शहादामार्गे गुजरात राज्यात चोरटी वाहतूक होणर असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला सोबत घेत सापळा रचला. शहादा शहरातील शिरुड चौफूली जवळ शहादा-प्रकाशा रस्त्यावर शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता संशयीत वाहन येताच त्यास अडवण्यात आले व वाहन चालक देवेंद्र खुमाराम मेघवाल (26, रा.रुपवास, धोडीवाडी बास, ढाणी सोजत, ता.सोजत, जि.पाली, राजस्थान) यास ताब्यात घेतल्यानंतर त्यास विचारणा करताच त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिल्यानंतर पंचांसमक्ष वाहनाची तपासणी केली असता त्यात 28 लाख 87 हजार 360 रुपये किंमतीचा अवैध दारू (217 खोके) आढळल्याने ती जप्त करण्यात आली व आरोपीविरुध्द शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त.एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, हवालदार मोहन ढमढेरे, नाईक विकास कापुरे, कॉन्स्टेबल शोएब शेख, भरत उगले, सतीश घुले आदींच्या पथकाने केली.
