यावल शहरात 29 व 30 एप्रिल रोजी स्वराज्य चषक क्रिकेट स्पर्धा
प्रथमच नाईट क्रिकेट : ग्राउंड स्क्रीन, युट्युब लाईव्हचे आयोजन
Swaraj Cup Cricket Tournament in Yawal City on April 29 and 30. यावल (26 एप्रिल 2026) : यावल शहराच्या इतिहासात प्रथमच भव्य अशी दोन दिवसीय नाईट क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मेश ऍग्रो प्रायोजित स्वराज्य चषक क्रिकेट स्पर्धा आहे. यामध्ये ग्राउंडवर स्क्रीन आणि युट्युब लाईव्ह चे मुख्य आकर्षण आहे. या स्पर्धेत एकूण दहा संघ सहभागी असून यातील चार संघ हे आमंत्रित आहेत. यामध्ये सर्वपक्षीय राजकारणी, पोलीस संघ, महसूल संघ आणि पत्रकार संघाचा समावेश आहे. सर्व सामने बस स्थानकाशेजारील मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. यात बुधवारी उद्घाटन आणि गुरुवारी बक्षीस वितरण असा सोहळा होईल.
29 रोजी स्पर्धेला सुुरवात
शहरात बस स्थानकाला लागून एसटी महामंडळाचे मैदान आहे. या मैदानावर 29 एप्रिल रोजी मेश ऍग्रो प्रायोजित स्वराज्य चषक नाईट क्रिकेट स्पर्धा सुरू होत आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी आमदार अमोल जावळे असतील तर उद्घाटन फैजपूरचे प्रांताधिकारी बबनराव काकडे करतील. या स्पर्धेत प्रमुख अतिथी म्हणून यावलच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष छाया पाटील, एनएसयुआयचे राज्य चिटणीस धनंजय चौधरी, डीवायएसपी अनिल बडगुजर, तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, नगरसेवक अतुल पाटील, भाजपाच्या गटनेता नंदा महाजन, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, आश्रय फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे व मेष ऍग्रो इंडस्ट्रीजचे व्यवस्थापक युनूस मन्सुरी यांची उपस्थिती असेल.

प्रथम नाईट टूर्नामेंट
यावल शहराच्या इतिहासात प्रथमच नाईट टूर्नामेंट होणार असून मुख्य आकर्षण म्हणजे मैदानावर लावली जाणारी स्क्रीन आणि युट्युब लाईव्ह हे आहे. स्पर्धेतील प्रत्येक सामने हा लाईव्ह पाहता येणार आहेत तसेच या स्पर्धेचे बक्षीस वितरण गुरुवार, 30 एप्रिल रोजी रात्री दहा वाजता होईल. मान्यवरांच्या उपस्थितीमध्येच येथे बक्षीस वितरण पार पडणार आहे. यात मुख्य आकर्षण म्हणजे पत्रकार संघ, राजकीय पुढार्यांचा संघ पोलिसांचा संघ आणि महसूल विभागाचा संघ या स्पर्धेत सहभागी आहे. या संपूर्ण स्पर्धेचे आयोजन शेखर पटेल, सुनील गावडे, कैलास भोईटे, रोहित सुतार, अक्षय भोईटे, रामभाऊ यादव, वेदांत सराफ सह संपूर्ण स्वराज्य चषकातील सहभागी संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
पक्षाची पादत्राणे बाहेर ठेवून सर्वपक्षीय एकसंघ होतील
नुकत्याच नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. यामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते आणि या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान टीका, टिप्पणी करताना मनदुभंगली असतील, मात्र, या क्रिकेट स्पर्धेत सर्वच पक्षाचे पदाधिकारी एका संघात येऊन एक संघ होऊन सामना खेळतांना दिसतील आणि या माध्यमातून दुभंगलेली मणने जुळतील आणि एकसंघ होऊन सर्व पक्षाचे पदाधिकारी एकत्र दिसतील खरंच आयोजन चांगले आहे. यातून केवळ निवडणूक पुरते आपण विरोधात रहावे नंतर मात्र आपण सर्व एकत्र यावे भावना जागृत होईल, असे आमदार अमोल जावळे म्हणाले.
