सोशल मिडीयावर लेवा समाजाबाबत आक्षेपार्ह टीप्पणी : भुसावळातील मुकेश गुंजाळविरोधात पोलिसांना निवेदन


भुसावळ (27 एप्रिल 2026) : भुसावळातील नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर शहरातील राजकारण पेटले आहे. अशातच माजी नगरसेवक मुकेश गुंजाळ यांनी सोशल मीडियावर लेवा पाटील समाजाविरोधात आक्षेपार्ह व द्वेषपूर्ण टिप्पणी केल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसेच्या पदाधिकार्‍यांनी बाजारपेठ पोलिसांकडे केली.

टीप्पणीने समाजात तेढ
बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना दिलेल्या निवेदनानुसार, भुसावळ शहरातील रहिवासी मुकेश गंगाराम गुंजाळ यांनी सोशल मीडियावरील फेसबुकवर एका पोस्टवर केलेली टिप्पणी समाजात तेढ निर्माण करणारी आहे. संबंधित पोस्टमध्ये भुसावळच्या नगराध्यक्षांविषयी उल्लेख करत लेवा पाटील समाजाबद्दल अवमानकारक, अपमानास्पद भाषा वापरली आहे.

या टीप्पणीमुळे समाजात गैरसमज पसरून सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. बूट चाटतो, लाचार समाज अशा शब्दप्रयोगांचा वापर करून समाजाच्या सन्मानाला धक्का पोहोचविण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे.

भुसावळ तालुका अनुसूचित जातीसाठी आरक्षित असल्याने अशा प्रकारच्या चुकीच्या व भडकावू वक्तव्यांमुळे जातीय तेढ वाढू शकते, अशीही भीती व्यक्त करण्यात आली असून संबंधित व्यक्तीवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी तसेच शहरात सामाजिक सलोखा राखण्यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर संघटनेच्या पदाधिकार्‍यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !