भुसावळात भाजपा महिला पदाधिकार्यांचे जनआक्रोश आंदोलन
भुसावळ (28 एप्रिल 2026) : लोकसभेसह विधानसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण देणार्या नारीशक्ती वंदन अधिनियम (महिला आरक्षण विधेयक) ला काँग्रेस व विरोधी पक्षांच्या आघाडीने विरोध केल्याच्या निषेधार्थ भुसावळात भाजपा महिला पदाधिकारी आणि समर्थकांनी जन आक्रोश आंदोलन केले. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर हे आंदोलन प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
आंदोलकांची तीव्र घोषणाबाजी
यावेळी भाजपच्या महिला पदाधिकार्यांनी काँग्रेस व विरोधी आघाडीच्या भूमिकेविरोधात तीव्र संताप व्यक्त करत घोषणाबाजी केली. संसदेत महिलांच्या राजकीय सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरणार्या नारीशक्ती वंदन विधेयकाला काँग्रेससह विरोधी पक्षांनी अडथळा निर्माण केला. महिलांना लोकसभा आणि विधानसभेत 33 टक्के आरक्षण देणारे हे संविधान दुरुस्ती विधेयक पास होऊ नये, यासाठी विरोधकांनी प्रयत्न केल्याचे यावेळी महिला पदाधिकारी म्हणाल्या. महिला कार्यकर्त्यांनी महिलांच्या हक्कांसाठी आणि सक्षमीकरणासाठी हा कायदा तातडीने लागू करण्याची मागणी केली आहे.

यांचा आंदोलनात सहभाग
उपनगराध्यक्षा शैलजा नारखेडे, नगरसेविका प्राची पाटील, सोनल महाजन, सोनल इंगळे, सीमा नरवाडे, पूजा तायडे, प्रिती पाटील, आशा पाटील, ममता नांगराची, अनिता सपकाळे, मेघा वाणी, प्रिया चौधरी, संगीता बियाणी, अनिता आंबेकर यांच्यासह भाजपा महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
