विधानपरिषद निवडणुकीत कुणाची लागणार वर्णी ? जाणून घ्या संभाव्य नावे ; प्रदेशाध्यक्ष दिल्लीत
Who will secure a nomination in the Legislative Council elections? Find out the probable names; State President is in Delhi. मुंबई (28 एप्रिल 2026) : महाराष्ट्रात होत असलेल्या विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपमध्ये मोठ्या हालचाली सुरू आहेत. 12 मे रोजी होणार्या या निवडणुकीत नऊ जागांसाठी मतदान होणार असून त्यापैकी पाच जागा भाजपच्या वाट्याला येणार आहे. अनेक इच्छुकांनी आपापली ताकद लावली असून संधी कुणाला मिळते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रदेशाध्यक्ष दिल्लीला रवाना
या प्रक्रियेत महत्त्वाची बाब म्हणजे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण स्वतः दिल्लीला रवाना झाले आहेत. तेथे केंद्रीय नेत्यांसोबत चर्चा करून अंतिम पाच उमेदवारांची नावे निश्चित केली जाणार आहेत. पुढील काही तासांत किंवा दिवसांत या नावांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

या उमेदवारांची नावे चर्चेत
संभाव्य उमेदवारांमध्ये माधवी नाईक, डॉ.उपेंद्र कोठेकर, मनोज कोटक, केशव उपाध्ये, रवी अनासपुरे, राजेश पांडे, दयाशंकर तिवारी, राम सातपुते, रणजितसिंह निंबाळकर, संजय काका पाटील, विवेक कोल्हे, जगदीश मुळीक, प्रमोद जठार, संजय केणेकर, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केचे आणि संजय भेंडे यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, अंतिम संधी कोणाला मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. भाजपने यावेळी निवडणुकीत पराभूत झालेल्यांना संधी न देता संघटनात्मक काम करणार्यांना प्राधान्य देण्याची भूमिका घेतल्याची माहिती आहे.
14 सुधारीत नावांची यादी दिल्ली दरबारी
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीने 30 जणांची यादी तयार करून ती दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे पाठवली होती. मात्र, ही यादी पाहिल्यानंतर केंद्रीय नेतृत्वाने मोठा निर्णय घेतला. या यादीतील जवळपास अर्धी नावे कमी करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानंतर राज्यातील नेतृत्वाने फेरविचार करून केवळ 14 नावांची सुधारित यादी पुन्हा दिल्लीला पाठवली आहे. त्यामुळे मूळ यादीतील कोणाची नावे वगळली गेली, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
