मी मराठी बोलतो, माझ्या रिक्षात बसा : भुसावळात मनसेचे मराठी अभियान जोमात


भुसावळ (28 एप्रिल 2026) : मी मराठी बोलतो, मला मराठी समजते या माझ्या रिक्षात बसा! अशा ठळक संदेशाचे पोस्टर लावण्याचे अभियान मंगळवार, 28 रोजी भुसावळ शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे उत्साहात राबविण्यात आले. शहरातील रिक्षा चालकांच्या वाहनांवर हे पोस्टर लावून मराठी भाषेचा सन्मान राखण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

प्रवाशांशी संवाद होणार सुलभ
महाराष्ट्र शासनाकडून नुकतेच जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, राज्यातील सर्व रिक्षा, टॅक्सी तसेच प-आधारित वाहतूक सेवा (ओला-उबेर) चालकांना मराठी भाषा येणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांशी संवाद अधिक सुलभ होऊन स्थानिक भाषेला प्राधान्य मिळणार आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भुसावळमध्ये पुढाकार घेत जनजागृतीचा हा उपक्रम हाती घेतला. शहरातील विविध भागांत मनसे पदाधिकार्‍यांनी चालकांशी संवाद साधत मराठी भाषेचा वापर वाढविण्याचे आवाहन केले.

विशेष म्हणजे, भुसावळ शहरातील रिक्षा चालकांनीही या अभियानाचे मनापासून स्वागत केले. होय, आम्ही मराठी बोलतो आणि आम्हाला मराठी बोलण्याचा अभिमान आहे, अशा भावना व्यक्त करत अनेक चालकांनी आपल्या रिक्षांवर उत्साहाने पोस्टर लावून घेतले. काही ठिकाणी चालकांनी स्वतःहून पुढाकार घेत पोस्टर लावण्याची तयारी दर्शवली, यामुळे या अभियानाला व्यापक प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे नेहमीच मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मितेच्या प्रश्नावर ठाम व आक्रमक भूमिका घेत आले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच राज्यभर अशा प्रकारच्या उपक्रमांना वेग मिळत असून, मराठीचा सन्मान अबाधित ठेवण्यासाठी मनसे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत.

या अभियानामुळे केवळ शासनाच्या निर्देशांची अंमलबजावणीच नव्हे, तर मराठी भाषेविषयी अभिमान आणि जागरूकता वाढण्यास मोठी मदत होणार असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.जमील देशपांडे यांच्या मार्गदर्शनानुसार उपजिल्हाध्यक्ष विनोद पाठक, शहराध्यक्ष दीपक सोनवणे, विलास कोळी तालुका उपाध्यक्ष, दशरथ सपकाळे, सुशील मोरे, महेंद्र महाजन. तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेत हा उपक्रम यशस्वीपणे राबविला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !