जळगाव कृउबा सभापती सुनील महाजनांची खुर्ची धोक्यात ; अविश्वास प्रस्तावाने वाढल्या अडचणी

18 पैकी 12 संचालक सहलीवर ; नूतन सभापतीपदी कुणाची लागणार वर्णी ?


Jalgaon APMC Chairman Sunil Mahajan’s Position in Jeopardy; Difficulties Mount Due to No-Confidence Motion जळगाव (28 एप्रिल 2026) : अवघ्या आठ महिन्यापूर्वीच राजकीय खेळ्यांनी कृउबा सभापतीपदी विराजमान झालेले सुनील महाजन हे सदस्यांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावाने अडचणीत सापडले आहेत. सोमवारी 18 पैकी 12 संचालकांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव सादर केला असून 12 सदस्य सहलीवर रवाना झाले आहेत.

ऑगस्टमध्ये सांभाळली खुर्ची
जळगाव बाजार समितीत जशास तसे उत्तर देण्याचे राजकारण पाहायला मिळत आहे.गेल्यावर्षी सुनील महाजन यांनी 13 संचालकांच्या मदतीने तत्कालीन सभापती श्यामकांत सोनवणे यांच्याविरुद्ध यशस्वी अविश्वास ठराव आणला होता. सोनवणेंना पायउतार करून 29 ऑगस्ट 2025 रोजी महाजन सभापती झाले खरे मात्र हे सुख औट घटकेचे ठरले आहे.

विशेष म्हणजे, ज्यांच्या विरोधात महाजन यांनी बंड केले होते, ते माजी सभापती श्यामकांत सोनवणे स्वतः बंडखोर संचालकांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते. मे 2023च्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची सत्ता आली, पण अंतर्गत गटबाजीमुळे सभापती बदलण्याचे सत्र थांबायला तयार नाही.

18 पैकी 12 संचालक सहलीवर
अविश्वास प्रस्ताव सादर करताना माजी सभापती श्यामकांत सोनवणे, लक्ष्मण पाटील, मनोज चौधरी, रवी देशमुख यांच्यासह 12 संचालक आक्रमक पवित्र्यात दिसून आले. यापूर्वी 18 पैकी 13 संचालकांनी सोनवणेंविरुद्ध बंड केले होते, मात्र आता पुन्हा एकदा बहुमताचा आकडा महाजनांच्या विरोधात सरकल्याचे स्पष्ट होत आहे. प्रस्ताव सादर करून सायंकाळी 6.15 वाजता हे संचालक मोबाईल बंद करून सहलीला निघाले.

मनमानी कारभारावर रोष
जिल्हाधिकार्‍यांना सादर करण्यात आलेल्या प्रस्तावावर 12 संचालकांच्या स्वाक्षर्‍या आहेत. सभापती सुनील महाजन हे मनमानी पद्धतीने सभा घेतात. इतिवृत्त, महत्त्वाची कागदपत्रे इतर संचालकांना दाखवली जात नाही. ठरावांच्या बाबतीत इतर संचालकांना पूर्वकल्पना दिली जात नसल्याचे आरोप प्रस्तावात करण्यात आले आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !