भुसावळसह विभागात विषारी दारुची खुलेआम विक्री : राष्ट्रवादीची उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार
तक्रारीची दखल घेत प्रशासन ताळ्यावर : विषारी दारुचे सिंडिकेट नष्ट करण्याची अपेक्षा
Open Sale of Toxic Liquor in the Division, Including Bhusawal: NCP Lodges Complaint with Deputy Chief Minister भुसावळ (28 एप्रिल 2026) : रावेर लोकसभा मतदारसंघातील विशेषत: भुसावळ, यावल,रावेर व मुक्ताईनगर या तालुक्यांसह संपूर्ण जिल्ह्यात रसायनयुक्त घातक अशी विषारी दारूची माठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी याकडे पूर्णतः दुर्लक्ष चालवले असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आक्रमक पवित्रा घेत उपमुख्यमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांचे मंत्रालय गाठून थेट तक्रार केली. या तक्रारीची तात्काळ दखल घेण्यात येऊन कठोर कारवाई करण्याचे निर्देश देत असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले.
राज्य उत्पादन शुल्कच्या कारभारावर बोट
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष तथा भुसावळचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या नेतृत्वात श्रीमती सुनेत्रावहिनी पवार यांना देण्यात आलेल्या तक्रारीत जळगाव जिल्ह्यातील उत्पादन शुल्क विभागाच्या निष्क्रिय व भोंगळ कारभाराबाबत अनेक बाबी उघड करत नागरिकांच्या या विभागाबाबत असंख्य तक्रारी असल्याचे म्हटले आहे.

सर्रास खुल्या विक्रीला पायबंध घालावा
ग्रामीण भागातील गावा-गावात तसेच शहरी भागात पानटपर्या, लहान किराणा दुकाने, भेळ व अंडा-ऑमलेट विक्रीच्या हातगाड्यांवर ‘पन्नी-फुगा’ अशा नावांनी रसायनयुक्त विषारी दारू सर्रास अवैध पद्धतीने विक्री करण्यात येत आहे. ऑक्सिटोन नावाचे घातक रसायन या दारू विक्रीसाठी वापरले जाते. हे रसायन या दारू विक्रेत्यांना मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्याचे, दारू तयार करण्याचे ते विक्री करण्यापर्यंतचे हे मोठे सिंडिकेटच असून या दारूमुळे व्यसनाच्या आहारी गेलेल्या अनेक युवकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत, यावर पायबंद घालण्याचे अत्यावश्यक असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
काय आहेत शिष्टमंडळाच्या मागण्या
जळगाव जिल्ह्यातील अवैध दारू विक्रीवर तात्काळ विशेष मोहिम राबवून कठोर कारवाई करण्यात यावी, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक व विभागीय निरीक्षक अशा जबाबदार अधिकार्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अवैध पद्धतीने रसायनयुक्त या विषारी दारू विक्रीचे सिंडिकेट उध्वस्त होण्यासाठी कायमस्वरूपी प्रभावी यंत्रणा उभारण्यात यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
तत्काळ उपाययोजना राबविण्याचे आश्वासन
उपमुख्यमंत्री तथा राज्याच्या उत्पादन शुल्क मंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेत योग्य त्या उपाययोजना करण्याची ग्वाही शिष्टमंडळाला दिली. तक्रार निवेदन देताना जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांच्यासह जिल्हा सरचिटणीस विवेक ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष सोपान दुट्टे व मुक्ताईनगरचे माजी उपनगराध्यक्ष आसीफ बागवान यांची उपस्थिती होती.
