अवैध वाळू वाहतुकीसाठी अमळनेर तहसीलदारांच्या नावाने लाच मागितली : दोघे धुळे एसीबीच्या जाळ्यात


गणेश वाघ
भुसावळ (28 एप्रिल 2026) : अवैध वाळू वाहतूक करू देण्यासाठी अमळनेर तहसीलदारांच्या नावाने पन्नास हजारांची लाच मागून तडजोडीअंती 25 हजार रुपये स्वीकारताना दोघांना धुळे एसीबीने अटक केल्याने महसूल वर्तुळातील लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. रामराव हरचंद पाटील (64, लोणपंचम, ता.अमळनेर) व जितेंद्र राजेंद्र पाटील (26, झाडी, शिरसाळे, ता.अमळनेर) अशी अटकेतील संशयतांची नावे आहेत.

असे आहे लाच प्रकरण
तक्रारदार यांचा गौण खनिज वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यांच्या दोन ट्रॅक्टरने मांडळ येथील पांझरा नदीतून वाळूची वाहतूक करू देण्यासाठी खाजगी इसम रामचंद्र पाटील व जितेंद्र पाटील यांनी तक्रारदाराकडे अमळनेर तहसीलदारांच्या नावाने प्रति ट्रॅक्टर 25 हजार रुपये अशी 50 हजार रुपये लाच मागितली होती. तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी धुळे एसीबीकडे प्रत्यक्ष तक्रार दाखल केली व मंगळवार, 28 रोजी पडताळणीअंती सापळा रचून दोघा आरोपींना अटक करण्यात आली. दरम्यान खाजगी इसमाने थेट तहसीलदारांच्या नावाने लाच मागितल्याने आता तहसीलदारांच्या अडचणी वाढल्या असून त्यांची देखील चौकशी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा धुळे एसीबी लचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रवीण मोरे, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, सागर शिर्के, प्रीती चौधरी, चंद्रकांत सैंदाणे, रेश्मा परदेशी, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर आदींच्या पथकाने यशस्वी केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !