20 हजारांची लाच भोवली : नंदुरबार समाजकल्याण विभागाच्या वरिष्ठ सहाय्यक, लेखाधिकारी व कंत्राटी अभियंता एसीबीच्या जाळ्यात
गणेश वाघ
Bribe of ₹20,000 Proves Costly: Senior Assistant, Accounts Officer, and Contractual Engineer from Nandurbar Social Welfare Department Caught in ACB Net भुसावळ (29 एप्रिल 2029) : पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामासाठी लागणार्या प्रशासकीय मान्यतेच्या आदेशाची प्रत देण्यासाठी तडजोडीअंती 20 हजारांची लाच मागून ती स्वीकारताना नंदुरबार समाजकल्याण विभागातील वरिष्ठ सहाय्यक रमेश मन्साराम बागुल (56, सुप्रीया नगर, नंदुरबार), सहा.लेखाधिकारी चंद्रेश जगजीवनदास शहा (51, देसाईपूरा, नंदुरबार) व शहादा पंचायत समितीतील ग्रामीण गृहनिर्माण अभियंता (कंत्राटी) भूपेंद्र सरपंचराव राठोड (31, शिवसुंदरम नगर, शहादा) यांना नंदुरबार एसीबीने बुधवारी दुपारी अटक केल्याने लाचखोर प्रचंड हादरले आहेत. शहादा येथे दुपारी हा सापळा यशस्वी करण्यात आला.
असे आहे लाच प्रकरण
तक्रारदाराने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास योजनेंतर्गत कुकावल येथील अनुसूचित जाती व नवबौद्धांच्या वस्तीत पेव्हर ब्लॉक सवण्यासाठी कामासाठी नंदुरबार जि.प.कडे प्रस्ताव सादर केला व 31 ऑक्टोबर 2025 रोजी प्रस्तावाला मंजुरी मिळून दोन लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. मंजुरीबाबत प्रशासकीय मान्यता आदेशाची प्रत रमेश बागुल यांनी भूपेंद्र राठोड यांच्याकडे परस्पर दिली. आदेशाची प्रत प्राप्त न झाल्याने तक्रारदाराने 27 एप्रिल रोजी बागुल यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी भूपेंद्र राठोड यांच्याकडे 20 हजार रुपये देण्याचे सांगून लाच मागितल्यानंतर नंदुरबार एसीबीकडे तक्रार नोंदवून सापळा रचण्यात आला. यावेळी शहा यांनी लाच मागणीला प्रोत्साहन दिले.

शहाद्यात सापळा रचून अटक
सुरूवातीला बुधवारी दुपारी सापळा रचण्यात आला. कंत्राटी अभियंता भूपेंद्र राठोड याने तक्रारदाराकडून 20 हजारांची लाच स्वीकारताच त्यास शहादा येथे अटक करण्यात आली व नंतर अन्य दोन आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईने नंदुरबार समाजकल्याण विभागासह शहादा पंचायत समितीतील लाचखोर प्रचंड हादरले आहेत.
यांनी केला सापळा यशस्वी
नंदुरबार एसीबीचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत भरते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास लोंढे, सहाय्यक उपनिरीक्षक विलास पाटील, हवालदार देवराम गावीत, हवालदार विजय ठाकरे, हवालदार हेमंतकुमार महाले, हवालदार नरेंद्र पाटील, हवालदार जितेंद्र महाले, हवालदार संदीप खंडारे, नाईक सुभाष पावरा आदींच्या पथकाने यशस्वी केला.
