जळगाव नूतन अधीक्षकांची गोवंश वाहतुकीविरोधात धडक मोहिम : 78 पशूधनाची सुटका तर 24 गुन्ह्यांद्वारे 25 आरोपींना बेड्या
Jalgaon’s New Superintendent Launches Crackdown Against Cattle Transport: 78 Head of Livestock Rescued; 25 Accused Arrested Across 24 Cases. जळगाव (3 मे 2026) : जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी पदभार घेतल्यानंतरच्या पहिल्या दिवसापासून धडक मोहिम राबवली जात असून वाळू तस्करानंतर आता मोर्चा गोवंध तस्करांकडे पोलीस दलाने वळवला आहे. आतापर्यंत 24 गुन्ह्यांद्वारे 25 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या असून या कारवाईने तस्कर हादरले आहेत. सीमावर्ती भागातून होणारी गोवंश तस्करी थांबवण्यासाठी अहोरात्र या नाक्यांवर पोलिसांचे पथक तैनात करण्याची मागणी गोप्रेमींची आहे.
विशेष मोहिमेचा दणका
30 एप्रिल ते 2 मे दरम्यान संपूर्ण जिल्ह्यात ‘महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम’ अंतर्गत ही धडक मोहीम राबवण्यात आली. या तीन दिवसांच्या कालावधीत धरणगाव, यावल, शनिपेठ, भडगाव, चाळीसगाव, रावेर, पाचोरा आणि एमआयडीसी यांसारख्या प्रमुख पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी धाडी टाकल्या. या कारवाईत एकूण 24 गुन्हे दाखल करण्यात आले असून 25 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

लाखोंचा मुद्देमाल जप्त
पोलिसांच्या माहितीनुसार, या मोहिमेत तब्बल 78 जिवंत जनावरांची (गाय, बैल, गोर्हे व म्हशी) कत्तलखान्यात जाण्यापूर्वी सुटका करण्यात आली तसेच 463 किलो अवैध गोमांस हस्तगत करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या जनावरांची आणि मांसाची किंमत सुमारे 15 लाख 23 हजार 230 रुपये इतकी आहे. याशिवाय, तपासादरम्यान अवैध वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली 14 वाहने जप्त करण्यात आली असून त्यांची किंमत 46 लाख 10 हजार रुपये आहे. संपूर्ण मोहिमेतील एकूण कारवाईची उलाढाल 61 लाख 33 हजार 230 रुपये इतकी मोठी आहे.
कडक कायद्याचा वापर
तस्करांविरुद्ध केवळ गुन्हे दाखल न करता, महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारित) अधिनियम 2015 आणि भारतीय न्याय संहिता 2023 मधील कठोर कलमांचा वापर करण्यात आला आहे. जप्त केलेल्या वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभागामार्फत दंडात्मक कारवाई देखील केली जाणार आहे.
तस्करांना इशारा
जिल्हा पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, गोवंश हत्या आणि अवैध वाहतूक करणार्यांची गय केली जाणार नाही. पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. जिल्ह्यात अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही निरंतर सुरू राहतील, असा सज्जड इशारा पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.