तमिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री सी.जोसेफ विजय


Tamil Nadu’s New Chief Minister, C. Joseph Vijay चेन्नई (10 मे 2026) : तमिळगा वेट्री कझगम (टीव्हीके) चे प्रमुख आणि अभिनेता-राजकारणी सी. जोसेफ विजय यांची अखेर मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली असून त्यांनी तमिळ भाषेत शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यादरम्यान राहुल गांधी देखील उपस्थित होते. शपथ घेत असताना, विजय यांनी ठरवून दिलेल्या मजकुरापलीकडील शब्द उच्चारण्यास सुरुवात केली. त्यावेळी राज्यपाल अर्लेकर यांनी त्यांना थांबवले आणि केवळ लेखी स्वरूपात उपलब्ध करून दिलेला मजकूरच वाचण्याची सूचना दिली.

नऊ मंत्र्यांचा शपथविधी
विजय यांच्यासोबत आणखी नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये एन. आनंद, अधव अर्जुन, डॉ.के.जी. अरुणराज, के.ए.सेनगोट्टैयन, पी. वेंकटरमणन, आर. निर्मलकुमार, राजमोहन, डॉ.टी.के. प्रभू आणि सेल्वी एस. कीर्तना यांचा समावेश आहे.



हे सर्व आमदार विजय यांच्या ‘टीव्हीके’ या पक्षाचे सदस्य आहेत. सद्यस्थितीत, विजय यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात आघाडीतील मित्रपक्षांच्या एकाही आमदाराचा समावेश करण्यात आलेला नाही.

तत्पूर्वी, शनिवारी विजय यांनी राजभवनाला भेट देत 121 आमदारांच्या पाठिंब्याची पत्रे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्याकडे सुपूर्द केली. त्यानंतर, राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले.

विजय यांच्या अवघ्या दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या टीव्हीके पक्षाने, आपल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत 234 पैकी 108 जागा जिंकून एक मोठा विक्रम प्रस्थापित केला आहे. आपल्या मित्रपक्षांच्या पाठिंब्यासह, विजय यांच्याकडे 121 आमदारांचा भक्कम पाठिंबा उपलब्ध आहे तर साध्या बहुमताचा आकडा 118 इतका आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !