रुपाली चाकणकरांची एसआयटीकडून कसून चौकशी : म्हणाल्या, तपास पूर्ण होताच तुमच्या प्रश्नांना उत्तरे मिळणार !
मुंबई (10 मे 2026): राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची रविवारी नाशिकमधील विशेष तपास पथकाकडून कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीसाठी चाकणकर पुण्याहून नाशिकला पोहोचल्या असून माध्यमांशी बोलताना त्यांनी चौकशी पूर्ण झाल्यानंतर तुमच्या प्रश्नांना उत्तरे मिळणार असल्याचा दावा केला आहे.
काय म्हणाल्या चाकणकर ?
नाशिकमध्ये चौकशीसाठी दाखल झाल्यानंतर माध्यमांनी रुपाली चाकणकरांना गराडा घातला. यावेळी माध्यमांच्या प्रश्नांना त्यांनी अगदी शांतपणे उत्तरे दिली. त्या म्हणाल्या, एसआयटी पथकाकडून याप्रकरणाचा जो तपास सुरू आहे, त्या संदर्भात त्यांचे काही प्रश्न असतील आणि त्यांना काही उत्तर हवे असतील तर ते देण्यासाठी मी आज नाशिकमध्ये आले आहे. एसआयटीला तपासात मी पूर्णपणे सहकार्य करेल. ती माझी जबाबदारी आहे. तपासाला सामोरे जात असताना जी-जी मदत पोलिसांना व तपास अधिकार्यांना हवी असेल त्यांना मी ती करेल. कोण काय बोलत आहे याची मला कल्पना नाही. परंतु तपास पूर्ण झाल्यानंतर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील.


ती खाती तर बनावट : चाकणकर
पत्रकारांनी यावेळी त्यांना समता पतसंस्था आणि जगदंबा पतसंस्थेत असलेल्या अशोक खरातच्या बँक खात्यांशी तुमचा संबंध काय? असा प्रश्न केला असता त्यांनी ती सर्व खाती बनावट असल्याचा दावा केला. तसेच त्याचा अहवाल समोर येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भोंदू अशोक खरातसोबतच्या संबंधांवर काय म्हणाल्या?
भोंदू अशोक खरात यांच्याशी संबंधावर आणि आरोपावर विचारले असता त्यावर चाकणकर म्हणाल्या, मला असे वाटते की अनेक शंका तुमच्या सगळ्यांच्या मनात आहेत. ज्यावेळेस हा तपास पूर्ण होईल, त्या तपासातूनच तुमच्या प्रश्नांना उत्तरे मिळतील. अंजली दमानिया यांनी या प्रकरणी केलेल्या आरोपांची आपल्याला कल्पना नाही.
पदाचा राजीनामा
वाढत्या राजकीय दबावामुळे चाकणकर यांनी अखेर राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. एसआयटी त्यांच्याकडून नेमकी कोणती माहिती मिळवते आणि या चौकशीतून काय निष्पन्न होते, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.