ईकेवायसी पूर्ण करणार्या लाडक्या बहिणींना तीन महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार ?
पुणे (11 मे 2026) : ई-केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण करणार्या महिलांच्या खात्यात गेल्या तीन महिन्यांचे रखडलेले अनुदान एकत्र जमा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शासन स्तरावर यासंदर्भात हालचाली सुरू असून अधिकृत घोषणा होण्याची प्रतीक्षा आहे. जर हा निर्णय मंजूर झाला, तर पात्र महिलांच्या खात्यात थेट 4500 रुपये जमा होऊ शकतात.
छाननी व निकषात लाखो लाडक्या बहिणी अपात्र
महायुती सरकारने जून 2024 मध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली होती. आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा 1500 रुपयांची मदत थेट बँक खात्यात जमा करण्याचा या योजनेचा मुख्य उद्देश होता. सुरुवातीला या योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला होता. जवळपास दोन कोटी 47 लाख महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले होते. ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत महिलांनी मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली मात्र त्यानंतर शासनाने अर्जांची छाननी आणि विविध निकषांची पडताळणी सुरू केल्यानंतर लाभार्थींची संख्या सातत्याने कमी होत गेली.


फेरतपासणीने वाढवली अडचण
सध्या पात्र महिलांची संख्या एक कोटी 89 लाखांपर्यंत स्थिरावल्याची माहिती समोर येत आहे. शासनाने ई-केवायसी, कुटुंबाचे उत्पन्न, सरकारी नोकरी तसेच इतर अटींच्या आधारे सखोल तपासणी सुरू केली होती. या पडताळणीत अनेक धक्कादायक प्रकार उघड झाले. काही महिलांनी चुकीची माहिती देऊन लाभ घेतल्याचे निदर्शनास आले, तर काही प्रकरणांमध्ये सरकारी सेवेत असतानाही स्वतःला पात्र दाखवून अनुदान मिळवण्यात आले होते. त्यामुळे शासनाने या योजनेत कठोर भूमिका घेत फेरतपासणी मोहीम सुरू केली.
तपासणीदरम्यान काही कुटुंबांचे उत्पन्न शासनाने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असल्याचेही आढळून आले. विशेष म्हणजे, काही ठिकाणी पुरुषांनी महिलांच्या नावाने अर्ज भरून योजनेचा लाभ घेतल्याची प्रकरणेही समोर आली आहेत. या सर्व बाबी उघड झाल्यानंतर शासनाने मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांची फेरतपासणी केली. मार्चअखेरपर्यंत 68 लाख महिलांना अपात्र घोषित करण्यात आले होते. या कारवाईमुळे अनेक ठिकाणी नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, शासनाने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त मुदत दिल्यानंतर अनेक महिलांनी आवश्यक कागदपत्रे अद्ययावत केली.
