जात पडताळणी समितीने दिलेला निर्णय राजकीय दबावातून : भुसावळात माजी आमदार संतोष चौधरींचा आरोप

गायत्री भंगाळे म्हणाल्या, खंडपीठाचा अंतिम निर्णय बाक ; आपल्याविरोधात नियोजित कट


भुसावळ (10 मे 2026) : भुसावळच्या नगराध्यक्षा गायत्री गौर-भंगाळे यांना जात-पडताळणी समितीने अपात्र ठरवले होते व हाच निर्णय राज्य शासनाने 4 मे रोजी दिला होता. या निर्णयानंतर शहरात राजकीयआरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार संतोष चौधरी यांनी भंगाळे यांना राजकीय दवाबानंतर जातपडताळणी समितीने अपात्र केले असल्याचा धक्कादायक दावा केला तर भंगाळे यांनी आपल्याला अपात्र करण्यासाठी कट रचण्यात आल्याचा दावा यावेळी पत्रपरिषदेत केला.

राजकीय फायद्यासाठी आरोपांची मालिका
पत्रकार परिषदेत बोलताना माजी आमदार संतोष चौधरी यांनी भाजपातील नगरसेवक आणि काही नेत्यांवर थेट टीका करताना म्हटले की, काही लोक केवळ राजकीय फायद्यासाठी आरोपांची मालिका सुरू ठेवत आहेत. सत्य जाणून न घेता शहरात चुकीची माहिती पसरवली जात आहे. जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, शहराच्या विकासापेक्षा विरोधकांना राजकारण आणि बदनामी करण्यात अधिक रस आहे. केवळ पत्रकार परिषद घेऊन आरोप केल्याने सत्य बदलत नाही. चौधरी यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष निशाणा साधत म्हटले की, भुसावळची जनता सर्व पाहत आहे. योग्य वेळ आल्यावर जनता स्वतः उत्तर देईल. रजनी सावकारे यांच्या जात प्रमाणपत्रावर चौधरींनी आक्षेप नोंदवत पतीच्या नावाने जात प्रमाणपत्र कसे ? असा प्रश्न उपस्थित करीत या संदर्भात तक्रार केल्याचे सांगितले.



आपल्याविरोधात कट :गायत्री भंगाळे
गायत्री गौर-भंगाळे म्हणाल्या की, आपल्याला अपात्र करण्यासाठी कट रचण्यात आला तसेच संबंधित प्रकरण अद्याप न्यायालयात प्रलंबित असून हायकोर्टाचा अंतिम निर्णय आलेला नाही. काही लोक न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वीच राजकीय निष्कर्ष काढत आहेत, हे चुकीचे आहे.

आमचा भुसावळशी दशकापासून संबंध
गायत्री गौर-भंगाळे यांनी आपल्याविरोधात जाणीवपूर्वक खोटी माहिती पसरवली जात असल्याचा गंभीर आरोप केला. मी भुसावळची रहिवासी नाही, असा खोटा प्रचार केला जात आहे. आमच्या कुटुंबाचा भुसावळशी दशकांपासून संबंध आहे. माझे आजोबा सन 1949 पासून रेल्वे सेवेत कार्यरत होते आणि त्यानंतर आमचे कुटुंब येथे वास्तव्यास आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

राजकीय दबावाचा आरोप
पत्रकार परिषदेत गायत्री गौर भंगाळे यांनी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, प्रमोद सावकारे आणि रजनी सावकारे यांच्यावर गंभीर आरोप करताना म्हटले की, खोट्या कामांसाठी अधिकार्‍यांवर दबाव टाकला जात असून राजकीय शक्तीचा वापर करून मला लक्ष्य केले जात आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !