यावल नगरपरिषदेच्या क्रीडांगणाच्या जागेचे सिटी सर्वे करून मोजमाप

मोजणी सीट प्राप्त झाल्यानंतर क्रीडांगण विकसित करण्याचे कामाला होणार सुरुवात


City survey and measurement of the playground area of ​​Yaval Municipal Council यावल (15 मे 2026) : यावल शहरातील सातोद रस्त्यावर असलेल्या नगरपरिषदेच्या नियोजित क्रीडांगणाच्या जागेचे शुक्रवारी मोजमाप करण्यात आले. या जागेचा मोबदला शेत-मालकास देण्यात आला होता मात्र ही जागा अद्यापपावेतो नगरपालिकेच्या ताब्यात घेण्यात आली नव्हती. आता जागा ताब्यात घेणे, मोजमाप करणे, ही कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

अधिकार्‍यांनी केली मोजणी
नगराध्यक्ष छायाताई पाटील यांच्या उपस्थितीत या ठिकाणी भूमी अभिलेखच्या अधिकार्‍यांनी मोजणी केली. लवकरच खुणा गाढल्या जातील आणि ही जागा अधिकृतरित्या मोजणी सीटसह नगरपालिकेच्या ताब्यात दिली जाईल व त्यानंतर येथे जलद गतीने क्रीडांगण विकसित केले जाईल असे प्रसंगी नगराध्यक्ष यांनी सांगितले.







यावल नगरपरिषदेच्या क्रीडांगणाचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. क्रीडांगणासाठी आरक्षित असलेल्या सातोद रस्त्यावरील शेत गट क्रमांक 37,सिटीसर्वे क्रमांक 3835 मधील 00.51 आर जागा ही क्रीडांगणासाठी आरक्षित करण्यात आली होती. या जागेचा मोबदला देखील संबंधित शेतीमालकाला देण्यात आला होता मात्र ही जागा अद्याप पावेतो नगरपरिषदेने ताब्यात घेतली नव्हती तर आता निवडणुक नंतर नगरपालिकेत लोकनियुक्त नगराध्यक्ष छायाताई अतुल पाटील यांनी पदभार स्विकारला व त्यांनी क्रीडांगणाचा प्रश्न हा मार्गी लावू, असे जाहीर केले होते.

या दृष्टिकोनातून आता कामाला सुरुवात झाली आहे. नगरपरिषदेच्या वतीने भूमी अभिलेख विभागाकडे आवश्यक ती फी भरण्यात आली होती व शुक्रवारी या ठिकाणी भूमी अभिलेखचे अधिकारी या ठिकाणी नगराध्यक्ष छायाताई पाटील, नगरसेवक अतुल पाटील, पराग सराफ, निसार मोमीन, उमर कच्छी, काँग्रेसचे शहराध्यक्ष हाजी हकीम शेख, मजहर शेख, सागर चौधरींसह आदींच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मोजणीला सुरुवात करण्यात आली.

संपूर्ण क्षेत्र मोजणी झाल्यानंतर खुणा गाढल्या जातील आणि मोजणी शीट तयार झाल्यानंतर सदर जागा ही कायदेशीर रित्या नगर परिषदेच्या ताब्यात दिली जाणार आहे. संपूर्ण जागा मोजणी करतांना नगरपरिषदेच्या मार्फत स्वच्छ देखील करण्यात आले आहे. नगर परिषदेचे स्वच्छता कर्मचारी तसेच जेसीबीच्या साह्याने उंच सकल भाग हा व्यवस्थित करण्यात चे काम सुरू करण्यात आले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !