भुसावळातील बालकाच्या मृत्यूचे प्रकरण : मुख्याधिकार्‍यांसह आरोग्याधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

सुजाण भुसावळकरांचे प्रांताधिकारी प्रशासनाला निवेदन : कारवाईकडे लागले लक्ष


Bhusawal Child Death Case : File a Case of Culpable Homicide Against the Chief Officer and Health Officers भुसावळ (18 मे 2026) : भुसावळातील नऊ वर्षीय तारकेश झोपे या बालकाचा कुत्र्यांनी केलेल्या हल्यात मृत्यू झाला होता. या प्रकरणाला जवाबदार असलेली खन्ना कोळी यांच्याकडील कुत्री पालिका प्रशासनाने ताब्यात घेतली मात्र त्यातील तीन कुत्र्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर त्यांची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली. या प्रकाराला जवाबदार असलेल्या पालिका मुख्याधिकारी व आरोग्यधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व पीडीत कुटूबियांना आर्थिक मदत देण्याची मागणी भुसावळातील सुजाण नागरिकांनी सोमवारी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्याकडे केली.

शाळकरी विद्यार्थी ठरला प्रशासकीय अनास्थेचा बळी
24 एप्रिल रोजी नारायण नगर भागातील रहिवासी बालक तारकेश झोपे याच्यावर कुत्र्यांनी हल्ला केल्याने त्याच्या शरीरावर 30 टाके पडले व रेबीज झाल्यने या बालकाचा मुंबईत मृत्यू ओढवला. हा मृत्यू नैसर्गिक नसून भुसावळ नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाच्या आणि अधिकार्‍यांच्या सुस्त कारभारामुळे झालेला प्रशासकीय खून आहे.

फाईल दाबण्याचे कारण काय ?
स्थानिक लोकप्रतिनिधी व मंत्री संजय सावकारे यांनी शहरातील मोकाट कुत्र्यांच्या नसबंदीसाठी व नियंत्रणासाठी पालिकेला निधी व निविदा प्रक्रियेपर्यंत सर्व तांत्रिक मदत उपलब्ध करून दिली होती परंतु 23 फेब्रुवारी 2024 रोजी काढलेली निविदा परगावच्या ठेकेदाराने नाकारल्यानंतर, पालिकेच्या अधिकार्‍यांनी कोणतीही फेरनिविदा न काढता ती फाईल दाबून ठेवली. या गुन्हेगारी स्वरूपाच्या हलगर्जीपणामुळेच आज तारकेशला आपला जीव गमवावा लागला आहे. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे बालकाला चावा घेणार्‍या सात पैकी तीन कुत्र्यांचा मृत्यू झाला आहे मात्र हा मृत्यू कसा झाला? त्यांचे शवविच्छेदन का झाले नाही व कुठलीही कारवाई होण्यापूर्वीच परस्पर कुत्र्यांची विल्हेवाट गुन्हा लपवण्यासाठी करण्यासाठी आली का? असा प्रश्न निवेदनाद्वारे विचारण्यात आला आहे.

मुख्याधिकारी व आरोग्य निरीक्षकांवर हवी कारवाई
निवेदनकर्त्यांनी मुख्याधिकारी आणि आरोग्य अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली तसेच निविदा प्रक्रिया रखडवून ठेवणार्‍या, साक्षीदारांना धमकावणार्‍या प्रवृत्तींना पाठीशी घालणार्‍या आणि कर्तव्यात निष्काळजीपणा करणार्‍या पालिकेच्या आरोग्य विभागातील सर्व जबाबदार कर्मचारी व सॅनिटरी इन्स्पेक्टर यांना तत्काळ शासकीय सेवेतून निलंबित करून त्यांची उच्चस्तरीय विभागीय चौकशी सुरू करावी, प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे झोपे कुटुंबाचा वंशाचा दिवा विझला असून त्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा आधार घेऊन भुसावळ नगरपरिषदेच्या तिजोरीतून पीडित कुटुंबाला तत्काळ पाच लाखांची आर्थिक मदत व सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या. मागण्यांची दखल न व कायदेशीर कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडले जाईल, ज्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल, असा इशारा देण्यात आला आहे.

यांची होती उपस्थिती
निवेदन देताना प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे, डॉ.नितु पाटील, शेखर महाजन, बबलू बर्‍हाटे, युवराज लोणारी, शैलजा पाटील, सोनम इंगळे, राजेंद्र नाटकर, सतीश सपकाळे, श्रेयस इंगळे, भूषण महाजन, पवन बुंदेले, विवेक पाटील, अमित असोदेकर, धर्मराज देवकर, संदीप सुरवाडे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !