नारपार-गिरणा योजना उत्तर महाराष्ट्रासाठी वरदान; महायुती सरकारने शेतकर्‍यांचा पाणीप्रश्न मार्गी लावला : पालकमंत्री गुलाबराव पाटील

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व जलसंपदामंत्र्यांचे पालकमंत्र्यांकडून आभार


जळगाव (18 मे 2026) : उत्तर महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी नारपार – गिरणा नदीजोड योजना आता प्रत्यक्ष गतीकडे वाटचाल करत असून, ही योजना जळगाव, नाशिक आणि धुळे जिल्ह्यांसाठी खर्‍या अर्थाने जलसंजीवनी ठरणार असल्याचे मत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

27 जून 2023 रोजी जळगाव येथे आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नारपार-गिरणा योजनेची ऐतिहासिक घोषणा केली होती. त्या घोषणेनंतर महायुती सरकारने सातत्याने पाठपुरावा करत या प्रकल्पाला प्रशासकीय मंजुरी, आर्थिक मान्यता आणि आता प्रत्यक्ष कार्यारंभ आदेशापर्यंत आणल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी सुमारे 4,116 कोटींच्या कामाचा कार्यारंभ आदेश जारी करण्यात आला असून, यामुळे उत्तर महाराष्ट्रातील दुष्काळी भागांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, जामनेर, धरणगाव परिसर तसेच नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, देवळा, सटाणा, कळवण आणि धुळे जिल्ह्यातील अनेक भागांना या योजनेचा मोठा लाभ होणार आहे.

या योजनेमुळे शेतीसाठी सिंचनाचे पाणी उपलब्ध होणार असून, केळी, कांदा, द्राक्ष, मका, कापूस यांसारख्या पिकांना स्थैर्य मिळणार आहे. भूजल पातळी वाढणे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कमी होणे, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणे आणि शेतकर्‍यांचे स्थलांतर कमी होणे असे अनेक सकारात्मक परिणाम या योजनेतून दिसून येणार आहेत.

याबाबत बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, नारपार-गिरणा योजना ही संपूर्ण महायुती सरकारच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे. 27 जून 2023 रोजी जळगाव येथे ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी योजनेची घोषणा करून उत्तर महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या आशा जागवल्या. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पाला प्रशासकीय आणि विकासात्मक गती दिली.दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आर्थिक नियोजन आणि मंजुरी प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली होती.

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सातत्याने पाठपुरावा केला. माझ्यासह मंत्री दादा भुसे तसेच जळगाव, नाशिक आणि धुळे जिल्ह्यातील सर्व मंत्री आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींनी एकमताने हा विषय शासनदरबारी मांडला. त्यामुळे आज अनेक वर्षांचा प्रलंबित पाणीप्रश्न मार्गी लागत आहे. ही योजना पूर्ण झाल्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी अधिक सक्षम होईल आणि भविष्यातील अनेक पिढ्यांसाठी ही योजना वरदान ठरेल.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे विशेष आभार मानत, महायुती सरकारने उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे सांगितले.

नारपार-गिरणा योजना ही केवळ नदीजोड योजना नसून उत्तर महाराष्ट्राच्या कृषी, उद्योग, पिण्याचे पाणी आणि ग्रामीण विकासाचा नवा अध्याय ठरणार असल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी महायुती सरकारच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत समाधान व्यक्त करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !