डिझेल दर वाढीने लवकरच ‘लालपरी’चा प्रवासही महागणार !
Due to the hike in diesel prices, travel on the ‘Lalpari’ is also set to become more expensive soon! मुंबई (20 मे 2026) : ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेल्या लालपरीचा अर्थात एस.टी.बसचा वाढत्या डिझेल दरवाढीमुळे प्रवास महागण्याची शक्यता आहे. याबाबतचे संकेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देत भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती दिली आहे. सर्वसामान्य प्रवाशांवर तातडीने अतिरिक्त भार टाकला जाणार नसून तत्काळ भाडेवाढ करण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
मंत्रालयात बैठक
मंत्रालयात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एसटी महामंडळाच्या वाढत्या इंधन खर्चाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.



मागील आठवड्यात इंडियन ऑईल कॉर्पोरेशनकडून पुरवठा होणार्या डिझेलचा दर प्रति लिटर 88.21 रुपये होता. आता तो वाढून 91.31 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच प्रति लिटर 3 रुपये 10 पैशांची वाढ झाली आहे. एसटी महामंडळाला दररोज सरासरी 10.87 लाख लिटर डिझेलची आवश्यकता भासते.
या वाढीमुळे महामंडळाला दररोज सुमारे 33 लाख 70 हजार रुपयांचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे. हा खर्च मासिक स्तरावर सुमारे 10 कोटी रुपये, तर वार्षिक स्तरावर तब्बल 124 कोटी रुपयांपर्यंत पोहोचणार आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं की, वाढत्या इंधन खर्चामुळे भविष्यात प्रवासी भाडेवाढीचा निर्णय घेणे अपरिहार्य ठरू शकते. यासाठी इंधन दरवाढीच्या अनुषंगाने भाडेवाढीचा प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाकडे मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे. प्राधिकरणाची मंजुरी मिळाल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल. त्यामुळे सध्या तरी एसटीच्या तिकीट दरात तातडीने वाढ होणार नाही.






