नामस्मरणाने होते अंतर्मनाचे शुद्धीकरण ; भक्तीमार्गातील सर्वात सोपे साधन : रमेशानंद महाराज
भुसावळातील वेडीमाता परिसरातील श्रीमद्भागवत सप्ताहात भाविकांची मोठी उपस्थिती
भुसावळ (22 मे 2026) : भुसावळातील वेडीमाता परिसरात रामदास निनू खर्चे यांच्या परिवारातर्फे अधिक मासानिमित्त 17 ते 23 मे दरम्यान श्रीमद्भागवत महापुराण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात ह.भ.प. रमेशानंद महाराज यांच्या ओजस्वी प्रवचनांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक भागवत श्रवणाचा लाभ घेत आहेत.
शरीराची शुद्धता पवित्र स्नानाने सहज साध्य
प्रवचनादरम्यान रमेशानंद महाराज यांनी नामस्मरणाचे महत्त्व विशद करताना सांगितले की, शरीराची शुद्धता पवित्र स्नानाने सहज साध्य होऊ शकते; मात्र अंतर्मनाचे शुद्धीकरण करण्यासाठी जाणीवपूर्वक ईश्वरनामाचा जप व नामस्मरण करण्याची सवय अंगीकारणे आवश्यक आहे. नियमित नामस्मरणामुळे मनाची एकाग्रता वाढते, विचार शुद्ध होतात आणि व्यक्ती आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत होत जाते, असे भागवत पुराणात सांगितले आहे.



भक्तीमार्ग हा ईश्वरप्राप्तीचा सर्वात सोपा मार्ग असून त्यामध्येही नामस्मरण हे अत्यंत प्रभावी साधन असल्याचे त्यांनी नमूद केले. वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी होण्याचा प्रवास तसेच ध्रुवबाळाच्या उद्धाराची उदाहरणे देत त्यांनी नाममहिमेचे महत्त्व भाविकांना पटवून दिले.
संपूर्ण सप्ताहभर धार्मिक वातावरण निर्माण झाले असून भागवत कथामृताचा आस्वाद घेण्यासाठी परिसरातील भाविक मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहत आहेत. श्रीमद्भागवत सप्ताहामुळे वेडीमाता परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.







