काँग्रेसच्या जळगाव पूर्व जिल्हाध्यक्षपदी धनंजय चौधरी

काँग्रेसकडून युवा नेतृत्वाला मोठी संधी : संघटन होणार अधिक बळकट


Dhananjay Chaudhary Appointed as Congress Jalgaon East District President सावदा (22 मे 2026) : काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष निवडीबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला. जळगाव जिल्ह्याच्या पूर्व विभागाच्या (रावेर लोकसभा क्षेत्र) जिल्हाध्यक्षपदी युवा नेते धनंजय शिरीष चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली. या निर्णयामुळे काँग्रेसने युवा नेतृत्वावर विश्वास दाखवत संघटन बळकट करण्याचा स्पष्ट संदेश दिला आहे.

केंद्रीय नेतृत्वाने दिली होती भेट
अखिल भारतीय काँग्रेस समितीने देशभरात संघटनात्मक फेरबदल करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातही नव्या जिल्हाध्यक्षांची निवड करण्यात आली. काही दिवसांपूर्वी केंद्रीय पथकाने जिल्ह्यात भेट देऊन स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली होती. तसेच, यापूर्वीच जळगाव जिल्ह्यात पूर्व, पश्चिम आणि महानगर असे तीन स्वतंत्र जिल्हाध्यक्ष नेमण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता.




पक्ष निष्ठेची दखल
या पार्श्वभूमीवर जळगाव पूर्व जिल्हाध्यक्षपदाची धुरा धनंजय चौधरी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यांनी रावेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. निवडणुकीत पराभव झाला असला तरी त्यांनी सातत्याने जनसंपर्क ठेवत पक्षाची भूमिका तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम केले. त्यांच्या सक्रियतेची आणि निष्ठेची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांना ही जबाबदारी दिली आहे.
विशेष म्हणजे, धनंजय चौधरी हे जळगाव जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्वात तरुण जिल्हाध्यक्ष ठरणार असून त्यांना मजबूत राजकीय वारसा लाभला आहे. धनाजी नाना चौधरी, मधुकरराव चौधरी आणि शिरीषदादा चौधरी यांच्या परंपरेतून त्यांनी राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

दरम्यान, जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्षपदी अ‍ॅड.अविनाश भालेराव यांची नियुक्ती करण्यात आली असून जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष म्हणून जमील शेख यांची निवड करण्यात आली आहे. या नियुक्त्यांमधून काँग्रेसने नव्या आणि अनुभवी चेहर्‍यांचा समतोल साधत संघटनात्मक मजबुतीकडे पाऊल टाकले आहे.

एकंदरीत, या नव्या नियुक्त्यांमुळे जिल्ह्यातील काँग्रेस संघटनेत नवचैतन्य निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून आगामी काळात राजकीय समीकरणेदेखील बदलण्याची दाट शक्यता आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !