पुणे विभागात मेगा ट्रॅफिक ब्लॉक ; अनेक रेल्वे गाड्या रद्द, मार्ग बदल आणि विलंबाने धावणार
विसापूर-रांजणगाव-सारोळा दरम्यान दुहेरीकरणाच्या कामामुळे मध्य रेल्वेचा निर्णय; प्रवाशांनी प्रवासापूर्वी वेळापत्रक तपासण्याचे आवाहन
Mega Traffic Block in Pune Division: Several Trains Cancelled, Diverted, or Running Late पुणे (23 मे 2026) : मध्य रेल्वेच्या पुणे विभागामार्फत दौंड-मनमाड मार्गावरील विसापूर, रांजणगाव आणि सारोळा स्थानकांदरम्यान दुहेरीकरणाच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या कामासाठी मेगा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या अंतर्गत प्री-नॉन इंटरलॉकिंग (प्री-एनआय) आणि नॉन-इंटरलॉकिंग (एनआय) कामे हाती घेण्यात येणार असून, त्याचा परिणाम अनेक रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर होणार आहे.
या ब्लॉकमुळे काही गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या असून, अनेक गाड्यांचे मार्ग तात्पुरते बदलण्यात आले आहेत. तसेच काही गाड्या उशिराने धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.




या गाड्या राहणार रद्द
अमरावती-पुणे एक्सप्रेस, पुणे-अमरावती एक्सप्रेस, वीरांगना लक्ष्मीबाई झाँसी-हडपसर विशेष, हडपसर-वीरांगना लक्ष्मीबाई झाँसी विशेष तसेच नागपूर-पुणे आणि पुणे-नागपूर विशेष गाड्या ठराविक दिवशी रद्द करण्यात आल्या आहेत.
अनेक गाड्यांचे मार्ग बदलले
हावडा-पुणे एक्सप्रेस, जम्मूतावी-पुणे एक्सप्रेस, पुणे-नागपूर एक्सप्रेस, हडपसर-बनारस एक्सप्रेस, केएसआर बंगळूर-नई दिल्ली एक्सप्रेस यांसह अनेक महत्त्वाच्या गाड्या पर्यायी मार्गाने धावणार आहेत. या गाड्या मनमाड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, लोणावळा, कुर्डुवाडी, परभणी आदी मार्गाने वळवण्यात आल्या आहेत.
काही गाड्या उशिराने सुटणार
हडपसर-रेवा एक्सप्रेस, पुणे-गोरखपूर विशेष, पुणे-हावडा दुरांतो एक्सप्रेस आणि पुणे-दानापूर विशेष या गाड्या नियोजित वेळेपेक्षा 2 ते 8 तास उशिराने सुटणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासापूर्वी आपल्या गाडीची स्थिती तपासूनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. हे ब्लॉक सुरक्षित आणि सक्षम रेल्वे पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आवश्यक असल्याचे प्रशासनाने सांगितले असून, प्रवाशांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







