जळगावात शेअर मार्केट ट्रेडिंगच्या आमिषाने 279 गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक ; नार्वेकर दाम्पत्याला अटक
दोन्ही आरोपींना न्यायालयाने सुनावली 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी
Crores Swindled from 279 Investors in Jalgaon Under the Pretext of Share Market Trading ; Narvekar Couple Arrested जळगाव (26 मे 2026) : शेअर मार्केट ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील टीडब्ल्यूजे अॅसोसिएट्स प्रा. लि. या कंपनीच्या दोन मुख्य संचालकांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या कारवाईत कंपनीचे मुख्य संचालक समीर सुभाष नार्वेकर (35, रा.तळेगाव दाभाडे, जि. पुणे) व नेहा समीर नार्वेकर (36) यांना अटक करण्यात आली आहे.
असे आहे फसवणूक प्रकरण
आर्थिक गुन्हे शाखेकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार, डिसेंबर 2020 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत आरोपींनी गुंतवणूकदारांना शेअर मार्केट ट्रेडिंगची माहिती देणे, त्यांच्या वतीने व्यवहार करणे आणि निश्चित परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. या माध्यमातून कंपनीने तब्बल 279 गुंतवणूकदारांकडून 23 कोटी 81 लाख 72 हजार 530 रुपये उभे केले. मात्र मुदत पूर्ण झाल्यानंतरही गुंतवणूकदारांना परतावा अथवा मूळ रक्कम न देता फसवणूक केली.
या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 मधील विविध कलमे तसेच अनियमित ठेव योजना प्रतिबंधक अधिनियम 2019 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान कंपनीचा फंड मॅनेजर मिलिंद शालिग्राम पाटील याला यापूर्वीच अटक करण्यात आली असून तो न्यायालयीन कोठडीत आहे.
आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने 25 मे रोजी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे आणि संगमनेर परिसरातून दोन्ही मुख्य आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना 26 मे रोजी जळगाव येथे आणून न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने दोघांनाही 29 जून 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
राज्यभरात फसवणुकीचे गुन्हे दाखल
दरम्यान, टीडब्ल्यूजे अॅसोसिएट्सविरोधात महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. जळगाव, पुणे, नवी मुंबई, तळेगाव, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि सांगलीसह विविध ठिकाणी कंपनीविरोधात फसवणुकीचे गुन्हे नोंद आहेत. तपासादरम्यान कंपनीचा फंड मॅनेजर मिलिंद शालिग्राम पाटील याला यापूर्वीच अटक करण्यात आली असून तो न्यायालयीन कोठडीत आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक संदीप पाटील, एपीआय गणेश फड, विकास पहूरकर, घनश्याम पवार, स्मिता पाटील, विलास तायडे, रतीलाल पवार, भरत जेठवे, निलेश सूर्यवंशी, मुद्दस्सर काझी, नवल हटकर आदींनी ही कारवाई केली.
गुंतवणूकदारांनी पुढे येऊन माहिती द्यावी, असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात आले आहे.
महत्त्वाचे आकडे
फसवणूक झालेले गुंतवणूकदार : 279
जमा रक्कम : 23.81 कोटी
अटक आरोपी : 2 मुख्य संचालक
आधीच अटकेत : 1 फंड मॅनेजर
पोलीस कोठडी : 29 जून 2026 पर्यंत

