प्रेमाचे नाटक करीत 140 तरुणींना गंडा ! आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
140 Young Women Swindled Under the Pretext of Love ! Accused Lands in Police Net. डोंबिवली (26 मे 2026) : सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींसोबत ओळख होताच प्रेमाचे नाटक करायचे, त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर या तरुणींच्या नावावर लाखो रुपयांचे कर्ज काढून पसार होणार्या भामट्याला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. आदर्श म्हात्रे असे आरोपीचे नाव आहे.
काय आहे प्रकरण ?
डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांच्या माहितीनुसार, पनवेल परिसरातील रहिवासी असलेला आदर्श म्हात्रे हा आरोपी सोशल मीडियावरून तरुणींशी मैत्री करून त्यांच्याशी जाणीवपूर्वक प्रेमसंबंध प्रस्थापित करत असे. त्यानंतर लग्नाचे आमिष व भविष्याची सुंदर स्वप्ने दाखवून तो या तरुणींचा पूर्ण विश्वास संपादन करायचा आणि याच विश्वासाचा गैरफायदा घेत त्यांच्या नावावर विविध बँकांमधून लाखो रुपयांचे कर्ज काढून तो पसार होत असल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे.
140 पेक्षा जास्त मुलींची फसवणूक
पोलिसांच्या तपासात एक अत्यंत धक्कादायक बाब उघडकीस आली असून, या आरोपीने आतापर्यंत तब्बल 140 हून अधिक तरुणींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. यात विशेष आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या फसवणुकीला बळी पडलेल्या बहुतांश महिला या उच्चशिक्षित असून त्या कॉर्पोरेट, बँकिंग, आर्थिक तसेच व्यावसायिक क्षेत्रात मोठ्या आणि जबाबदारीच्या पदांवर कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
11 तरुणींनी दाखवली हिंमत
या फसवणुकीच्या प्रकाराला कंटाळून आतापर्यंत 11 महिला आणि तरुणींनी धैर्याने पुढे येत पोलिसांकडे आपल्या अधिकृत तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र, बदनामीच्या भीतीपोटी अजूनही अनेक पीडित महिला तक्रार करण्यास टाळाटाळ करीत आहे.

