चोपडा पोलिसांची मोठी कारवाई : वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश ; राजस्थानसह नेपाळातील सहा महिलांची सुटका
Major Operation by Chopda Police: Prostitution Racket Busted; Six Women—Including Those from Rajasthan and Nepal—Rescued चोपडा (31 मे 2026) : चोपडा शहर पोलिसांनी शहरातील प्रताप हायस्कूल आणि तहसील कार्यालयाच्या पाठीमागील परिसरात सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश केला. या धडक कारवाईत पोलिसांनी सहा पीडित महिलांची सुटका केली असून, दोन महिला आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी एकूण 11 जणांवर पीटान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून नऊ संशयीत पसार झाले आहेत. राजस्थान तसेच नेपाळ भागातून आलेल्या सहा पीडीत असल्याचे सांगण्यात आले.
गोपनीय माहितीवरून कारवाई
चोपडा पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीच्या आधारे, 29 मे सायंकाळी 6.40 वाजेच्या सुमारास चोपडा शहरातील प्रताप हायस्कूलच्या मागे, तहसील कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या स्मशानभूमी रस्त्यालगत पोलिसांनी अचानक छापा टाकला. या ठिकाणी महिलांना पैशांचे आमिष दाखवून आणि आर्थिक फायद्यासाठी त्यांना आश्रय देऊन, त्यांच्याकडून सक्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याचे तपासात समोर आले आहे.
यांच्या विरोधात दाखल झाला गुन्हा
कॉन्स्टेबल मदन पावरा यांच्या फिर्यादीवरून संशयीत शिल्पा राजू लामा (35, रा.चोपडा), पूजा टीकराम थापा (29, रा.चोपडा) या दोघींना पोलिसांनी अटक केली असून शिवाजी भीमराव पाटील (रा.चोपडा), फरीद कदीर शेख (रा.चोपडा), शाहरूख वाहिद खान (रा.चोपडा), शरिफ रमजान तेली (रा.चोपडा), कालू उर्फ रंजीत चौधरी (रा.चोपडा), फिरोजी ईसा खान (रा.चोपडा), बाबू उर्फ जितेंद्र रावण वाडे (रा.चोपडा), संदीप उर्फ सोनू लक्ष्मण पाटील (रा.चोपडा), सुरेंद्र राजपूत (रा.चोपडा) अशा एकूण 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सुरूवातीच्या दोघा महिलांना अटक करण्यात आली असून उर्वरित नऊ संशयीत पसार झाले आहेत.
राजस्थानसह नेपाळातील महिलांकडून वेश्या व्यवसाय
या कारवाईदरम्यान पोलिसांनी ज्या 6 महिलांची सुटका केली, त्या प्रामुख्याने राजस्थान आणि नेपाळ येथील रहिवासी असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या पीडित महिलांना सुरक्षित स्थानी हलवण्यात आले असून त्यांना कायदेशीर संरक्षण आणि आवश्यक मदत पुरवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
अवैध कृत्यांची माहिती देण्याचे आवाहन
पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान, चोपडा शहर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, मानवी तस्करी, वेश्या व्यवसाय अथवा महिलांच्या शोषणासंदर्भात कोणतीही माहिती मिळाल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा व अशा गुन्ह्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार आहे.
