पोलिसांच्या हप्तेबाजीमुळे अवैद्य धंद्याचा महापूर : माजी खासदार राजू शेट्टींनी साधला निशाणा


कोल्हापूर (1 जून 2026) : आमदार नीलेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलिस हप्त्याची जी आकडेवारी सांगितली आहे त्यापेक्षा कोल्हापूर, सांगली, पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, सोलापूर, ठाणे, नवी मुंबई, नाशिक आदी ठिकाणी जास्त आहे. येथील हप्तेबाजीमुळे अवैद्य धंद्याचा महापूर आल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी केला.

अवैध धंदे सुरू ठेवण्यासाठी पोलिसांनी ठरवले हप्ते
मटका सुरू ठेवण्यासाठी दरमहा 15 ते 25 हजार, अवैद्य दारू विक्रीसाठी दरमहा 10 ते 15 हजार, अमली पदार्थ विक्रीतून दरमहा 75 हजार ते दीड लाख, गांजा विक्रीतून दरमहा 25 ते 50 हजार, अवैद्य लॅाज व्यवसायासाठी दरमहा 10 ते 15 हजार याप्रमाणे पोलिसांचे हप्त्याचे दर ठरले आहेत, असेही शेट्टी यांनी म्हटले आहे.

आमदार नीलेश राणे यांनी अत्यंत वास्तव घटना समाजासमोर मांडली आहे. राज्यात अवैद्य धंद्याना ऊत आला असल्याचे जळजळीत सत्य सर्व समाज उघड्या डोळ्यांनी बघत आहे. मी गेल्याच आठवड्यात बोललो होतो की, महाराष्ट्राची वाटचाल उडता पंजाबसारखी झाल्याचेही शेट्टी म्हणाले.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !