भुसावळातील ब्रिटीशकालीन 310 धोकेदायक, जीर्ण इमारतींकडे प्रशासनाचे यंदाही दुर्लक्ष
भुसावळ (1 जून 2026) : भुसावळ शहरात पावसाळ्याच्या पूर्वी जिर्ण व पडावू इमारतीचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. पालिकेने गेल्या काळात केवळ सोपस्कार म्हणून दोन इमारतींवर कारवाई केली. सध्या शहरात 60 धोकेदायक तर तब्बल 250 जीर्ण अशा एकूण 310 इमारती आहे. पावसाळ्यापूर्वी दरवर्षी पालिका जीर्ण इमारत धारकांना केवळ नोटीस बजावून सोपस्कार पूर्ण करीत आहे.
जीर्ण इमारतींना धोका
शहराला रेल्वेमुळे ब्रिटीशकालीन बांधकामाचा इतिहास लाभला आहे. शहरातील अनेक जून्या भागांमध्ये अद्यापही ब्रिटीशकालीन इमारती आहेत. कालानुरुप जिर्ण झालेल्या या इमारती मात्र अद्यापही रस्त्यांवर यमराज म्हणून उभ्या आहेत. पावसाळ्यात जीर्ण इमारतींना जास्त धोका राहतो. अशा जीर्ण इमारतींकडून कित्येकांचा जीव गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत. येत्या काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला आहे. अशात जीर्ण इमारतींपासून त्यात वास्तव्य करणारे, परिसरात रहणारे किंवा या रस्त्यावरुन वाहतूक करणार्यांना धोका होऊ शकतो. मालमत्ता धारकांच्या हलगर्जीपणामुळे कुणाच्या जिवावर बेतू नये किंवा मालमत्तेची हानी होऊ नये यासाठी अशा जीर्ण मालमत्ता किंवा तीचा जीर्ण भाग पाडणे गरजेचे असते मात्र प्रशासनाकडून केवळ डोळेझाक केली जात आहे.
2023 च्या भुकंपानंतरही प्रशासन सुस्त
शहरात 27 जानेवारी 2023 रोजी 3.3 रिश्टर स्केल भुकंपाची नोंद करण्यात आली होती. या भुकंपाचा केंद्रबिंदू भुसावळ होते. यानंतर पालिकेने जिर्ण व पडावू इमारतींच्या मालकांना नोटीस बजावली होती. आगामी काळात दुर्देवाने भुकंपासारखी नैसर्गिक आपत्ती घडली तर मोठी हानी होऊ शकते. यानंतरही प्रशासनाने बोध न घेता केवळ कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करण्याचे प्रकार कायम ठेवले आहेत.
या भागात जीर्ण इमारती
शहरातील विठ्ठल मंदिर वॉर्ड, राम मंदिर वॉर्ड, जाम मोहल्ला, सराफ बाजार, न्यू एरिया वॉर्ड, शनी मंदिर वॉर्ड, मॉडर्न रोड, जामनेररोडला लगत असलेल्या वस्त्या, म्युनिसीपल पार्क, वकिल गल्ली, कुलकर्णी प्लॉट, जूना सतारे, आगाखान वाडा, छत्रपती शिवाजी महाराज नगर आदींसह अन्य ठिकाणीही जून्या पडक्या इमारती कायम आहेत.
पालिकेच्या अडचणी अशा?
जीर्ण इमारतींमध्ये बरीच कुटूंब वर्षानुवर्षे भाडेतत्वावर राहत आहेत. अनेक प्रकरणांमध्ये मुळ घर मालक व भाडेकरुंचे न्यायालयीन वादविवाद सुरू आहेत. काही ठिकाणी इमला मालकांचे आपसातील हिस्सेवाटेवरुन वाद आहेत. यासर्व कारणांमुळे जून्या जिर्ण इमारती उभ्या आहेत. अशा न्यायप्रविष्ठ प्रकरणांमध्ये कारवाई करताना पालिका प्रशासनाला अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे कारवाईला वर्षानुवर्षे विलंब होत आहे.
वाद नसलेल्या इमारतींवर कारवाई
आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभुमीवर पडावू इमारतीमधील रहिवास धोकेदायक ठरू शकतो. यामुळे या इमारतींमधून आपला रहिवास इतरत्र हलवावा, अशा सुचना पालिका प्रशासनाकडून दिल्या जाणार आहेत. ज्या इमारतींबाबत न्यायालयीन वाद प्रलंबीत नाहीत, अशा इमारतींवर कारवाई केली जाणार असल्याचेही संकेत प्रशासनाने दिले आहेत.
सूचना फलक लावणार
जीर्ण इमारतींचा प्रश्न अनेक वर्षांपासूनचा आहे. या संदर्भात प्रशासनाकडून उपाययोजना केली जाते. जिर्ण इमारतींच्या परिसरात किमान धोकेदायक इमारत असल्याच्या सूचना फलक लावण्यासाठी प्रयत्न केले जातील. आवश्यकतेनुसार जिर्ण इमारतींवर कारवाई करण्याचे प्रशासनाला सूचित केले जाईल, असे प्रभारी नगराध्यक्षा, शैलजा नारखेडे म्हणाल्या.
