भुसावळ हादरले : बेदम मारहाणीत 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू
सहा संशयीतांविरोधात खुनाचे कलम वाढवणार बाजारपेठ पोलीस : लोखंडी रॉड, पिस्टलसह लाठ्या-काठ्यांचा वापर
गणेश वाघ
Bhusawal Shaken: 26-Year-Old Man Dies After Brutal Beating भुसावळ (2 जून 2026) : जुन्या वादातून शहरातील व्हीआयपीसीटी कॉलनी भागातील 26 वर्षीय तरुणाला सहा जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली होती. या तरुणाचा उपचारादरम्यान मुंबईच्या सायन रुग्णालयात सोमवार, 1 रोजी रात्री मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस आता सहा संशयीतांविरोधात खुनाचे कलम वाढवणार आहेत तर पसार आरोपींचा पोलिसांकडून आता शोध सुरू करण्यात आला आहे. मंगेश अंबादास काळे (26, भुसावळ) असे मारहाणीत मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
भुसावळच्या व्हीआयपीसीटी कॉलनी परिसरात मंगेश काळे (26) हा हातमजुरी करणारा तरुण पत्नी पायल (22) सह वास्तव्याला होता. 29 मे रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास तो गच्चीवर झोपण्यासाठी गेल्यानंतर सहा संशयीत आले व कुंदन पठाडे याने तु मातला असल्याचे सांगत लोखंडी रॉडने बेदम मारहाण सुरू केली तर रोहित नवगिरे याने लाकडी दांड्याने व विशालने हॉकी स्टीकने मारहाण सुरू केली. जीव वाचवण्यासाठी मंगेशने छतावरून उडी मारल्यानंतर संशयीतांनी पुन्हा पाठलाग सुरू केला व कुंदनने लोखंडी रॉडने कपाळावर मारहाण केली तर अन्य संशयीतांनी लाठ्या-काठ्यांनी मारहाण सुरू केली. यावेळी कुंदनने कमरेतून चॉपर काढल्यानंतर मारण्याचा प्रयत्न करताच त्यास अडवण्याच्या प्रयत्नात उजव्या हाताला जखम झाली व पत्नी खाली येत असताना संशयीत बाबा गेंगाट याने पिस्टल काढून पत्नीला धमकावत कुणाला फोन केल्यास गोळी घालण्याची धमकी दिली. यावेळी 112 वर कॉल केल्यानंतर पोलीस आल्यानंतर संशयीत पसार झाले.
जळगावात उपचार तर मुंबईत उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू
जखमी मंगेश काळे यास गंभीर जखमी अवस्थेत जळगावात हलवल्यानंतर त्याने शनीपेठ पोलिसांना जवाब दिल्यानंतर गुन्हा दाखल करून तो बाजारपेठ पोलिसात वर्ग करण्यात आला. दरम्यान, मारहाणीत जखमी काळे यांची प्रकृती अधिक खालावल्यानंतर त्यांना मुंबईच्या सायन रुग्णालयात हलवण्यात आले असता उपचारादरम्यान त्यांची सोमवार, 1 रोजी सायंकाळी प्राणज्योत मालवली. भुसावळ बाजारपेठ पोलिसांना माहिती कळवल्यानंतर हवालदार भाऊसाहेब पाटील व हवालदार जयेंद्र पगारे हे मंगळवारी सायन रुग्णालयात दाखल झाले व त्यांनी संंबंधित कागदपत्रे ताब्यात घेतली. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. या प्रकरणातील संशयीतांविरोधात काळे यांच्या जवाबावरून यापूर्वीच विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्यात आता तक्रारदाराचा मृत्यू झाल्याने खुनाचे कलम वाढवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यानी दिली.
या संशयीतांविरोधात गुन्हा
यापूर्वी मंगेश काळे यांच्या फिर्यादीवरून संशयीत कुंदन पठाडे, रोहित नवगिरे उर्फ दादु, विशाल गेंगाट, बाबा गेंगाट, अंकित, भावेश (पूर्ण नाव नाही, सर्व रा.भुसावळ) यांच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल असून आता या गुन्ह्यात खुनाचे कलम वाढवण्यात येणार आहे.



