काहूरखेडे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक समाधान जाधव यांचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव
भुसावळ (2 जून 2026) : रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन, दापोली यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा महाराष्ट्र राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2025-2026 हा मानाचा पुरस्कार भुसावळ तालुक्यातील काहूरखेडे जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षक समाधान रामचंद्र जाधव यांना प्रदान करण्यात आला.
संस्थेच्या नियमावली व पारदर्शक निवड प्रक्रियेनुसार राज्यभरातील शिक्षकांच्या शैक्षणिक, सामाजिक व विद्यार्थीकेंद्रित कार्याचा सखोल आढावा घेऊन पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली. यामध्ये जळगाव जिल्ह्यातून एकमेव प्राथमिक शिक्षक म्हणून समाधान जाधव यांची निवड झाली.
हा पुरस्कार पदवीधर आमदार सत्यजीत तांबे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय काशीद, महाराष्ट्र राज्य सल्लागार प्रदीप सोनवणे, जळगाव जिल्हाध्यक्ष गोविंद चौधरी तसेच संस्थेचे इतर पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
समाधान जाधव यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविलेले उपक्रम, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती तसेच सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले.
या सन्मानामुळे काहुरखेडे गाव, भुसावळ तालुका आणि जळगाव जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव वाढला असून विविध स्तरांतून समाधान जाधव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



