भुसावळात पावसाळ्यापूर्वी नालेसफाई मोहिम राबवा : मनसेचे नगरपालिका प्रशासनाला साकडे
Implement Pre-Monsoon Drain Cleaning Drive in Bhusawal: MNS Appeals to Municipal Administration भुसावळ (2 जून 2026) : शहरातील नाले व गटारींची तातडीने सफाई करण्यात यावी, अशी मागणी करत मनसे पदाधिकार्यांनी उपमुख्याधिकार्यांना निवेदन दिले. आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने पावसाळ्यापूर्वी एप्रिल व मे महिन्यात नालेसफाईचे काम पूर्ण होणे अपेक्षित असताना अद्यापही अनेक भागांमध्ये नालेसफाई सुरू झालेली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सध्या शहरातील नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा साचलेला असून काटेरी झाडे व झुडपे वाढली आहेत. त्यामुळे सांडपाणी तसेच पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. अनेक ठिकाणी नाल्यांसह गटारीही तुंबलेल्या असल्याने पावसाळ्यात पाणी साचून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
खडका रोड, राजा चौक, पापा नगर, पंचशील नगर, मरीमाता मंदिर परिसर, छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स, मामाची टॉकीज मागील भाग, भोई नगर तसेच ताडीचा मळा या खोलगट भागांमध्ये पावसाळ्यात पाणी साचण्याची शक्यता असल्याने आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
यामुळे शहरातील नाले व गटारींची सफाई तातडीने सुरू करून संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद पाठक, शहराध्यक्ष दीपक सोनवणे, तालुका सचिव विलास कोळी व सुशील मोरे उपस्थित होते.



