भुसावळातील मुख्याध्यापकाचे घर फोडणार्‍या आंतरराज्यीय टोळीला अटक

लाखोंचा मुद्देमाल जप्त : भुसावळ बाजारपेठ व जळगाव स्थानिक शाखेची संयुक्त कारवाई


Inter-state Gang That Burglarized Bhusawal Headmaster’s House Arrested भुसावळ (3 जून 2026) : शहरातील मुख्याध्यापकाचे भरदिवसा असलेले बंद घर पाहून चोरट्यांनी दोन तासात काम फत्ते करीत सुमारे 15 लाख रुपये किंमतीचे 10 तोळे सोने लंपास करण्यात आले होते. शहरातील मिरची ग्राऊंड परिसरातील हुडको कॉलनी भागात ही धाडसी घरफोडी रविवार, 31 मे रोजी दुपारच्या सुमारास घडली होती. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने या घरफोडीची उकल करीत परप्रांतीय आरोपींच्या टोळीला नागपूरातून बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या आरोपींना अटक
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने नागपूर पोलिसांना आरोपींची माहिती दिल्यानंतर तेथील घरफोडी विरोधी पथकाने तत्काळ कारवाई करत संशयीत राजू जसपालसिंग (42, हरियाणा), भोला उर्फ बिरेंद्र सुखदेव पासवान (40, बिहार), राजेश पारस शहा (52, बिहार) यांना अटक करण्यात आली तर जळगाव गुन्हे शाखेने या आरोपींचा ताबा घेतला.

नेमके प्रकरण काय ?
भुसावळातील महाराणा प्रताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश शिंदे मिरची ग्राऊंड परिसरातील हुडको कॉलनी भागात वास्तव्याला आहेत. परिवार बाहेरगावी गेल्याने शिंदे हे घरी एकटेच असताना रविवार, 31 मे रोजी 16 ते 1.30 दरम्यान ते कटींग-दाढीसाठी बाहेर पडल्यानंतर गेट व मुख्य दरवाजाला कुलूप लावण्यात आले मात्र चोरट्यांनी वर्दळ नसलेल्या परिसरात संधी संधी साधली.

तांत्रिक तपासातून आरोपींचा माग
घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांची ओळख पटविण्यात आली. तपासादरम्यान आरोपी भुसावळ रेल्वे स्थानक परिसरातील बालाजी लॉजमध्ये वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले. पुढील तांत्रिक तपासात आरोपींचे लोकेशन नागपूर येथील गणेशपेठ परिसरात आढळल्यानंतर तेथील पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर आरोपींना नागपुरातून अटक करण्यात आली. आरोपींकडून घरफोडीतील चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींना नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्यात हजर करून त्यांच्याविरुद्ध स्वतंत्र गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती आहे.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, हवालदार गोपाल गव्हाणे, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे, रिजवान शेख आदींनी केली. तपास बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान, या आंतरराज्यीय टोळीने इतर ठिकाणीही गुन्हे केले आहेत का? याचा तपास आता पोलीस कोठडीत केला जाणार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !