चार भावंडांची हत्या करणार्या बोरखेडा प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा : भुसावळ सत्र न्यायालयाचा ऐतिहासीक निकाल
27 साक्षीदारांची तपासणी : 13 वर्षीय बालिकेवर अत्याचार करून चौघा भावंडांची झाली होती हत्या
गणेश वाघ
Death Sentence for Accused in Borkheda Case Involving the Murder of Four Siblings: Historic Verdict by Bhusawal Sessions Court भुसावळ (4 जून 2026) : रावेर तालुक्यातील बोरखेडा शिवारातील चार भावंडांची निर्घृण हत्या करणार्या महेंद्र सीताराम बारेला या आरोपीला भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. भुसावळ शहरात अतिरीक्त सत्र न्यायालयाची स्थापना झाल्यानंतर प्रथमच एका गंभीर गुन्ह्यात आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याचे सांगण्यात आले. या खटल्यात विशेष सरकारी वकील अॅड.उज्वल निकम यांची शासनाने नियुक्ती केली होती तर 27 साक्षीदारांची तपासणी करण्यात आली व बुधवार, 3 जून रोजी जलदगती न्यायालयाचे विशेष न्यायाधीश संजय आर.यादव यांच्या न्यायासनापुढे या खटल्याचा अंतिम युक्तीवाद झाल्यानंतर गुरुवारी शिक्षा सुनावण्यात आली.
असे आहे नेमके प्रकरण?
रावेर तालुक्यातील बोरखेडा शिवारातील शेतात राहणार्या एका कुटूंबातील आई-वडील गावी गेल्यानंतर घरी असलेल्या चौघा भावंडांची हत्या करण्यात आल्याची घटना 15 ऑक्टोबर 2020 रोजी घडली होती. तत्पूर्वी कुटूंबातील 13 वर्षीय पीडीतेवर नराधम महेंद्र बारेलाने अत्याचार केला व त्याचवेळी पीडीतेच्या चार व आठ व 12 वर्षीय भावंडे जागी झाल्याने आरोपीने आपली ओळख उघड होवू नये यासाठी चौघाही भावंडांची कुर्हाडीने हत्या करीत पळ काढला होता. या हत्याकांडामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. जनतेच्या तीव्र भावना लक्षात घेऊन तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अॅड.उज्वल निकम यांची नियुक्ती केली होती.
बुधवारी युक्तीवाद पूर्ण : गुरुवारी सुनावली शिक्षा
या खटल्यातील आरोपी महेंद्र बारेला हा सुमारे सहा वर्षांपासून न्यायालयीन कोठडीत असून बुधवारी न्यायालयात खटल्याचा युक्तीवाद पूर्ण झाला. अॅड.उज्वल निकम यांनी न्यायालयात सांगितले की, आरोपी हा धूर्त लांडग्यासारखा असून त्याने शांत डोक्यात व क्रुरपणे हे हत्याकांड केल्याने त्याला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, असा 45 मिनिटांचा प्रदीर्घ आणि आक्रमक युक्तिवाद केला.
सत्र न्यायालयात प्रथमच फाशीची शिक्षा
जलदगती न्यायालयाचे विशेष न्यायाधीश संजय आर.यादव यांनी गुरुवार, 4 जून रोजी आरोपील महेंद्र सीताराम बारेला यास फाशीची शिक्षा सुनावली. भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालय स्थापन झाल्यानंतर एखाद्या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्याची ही प्रथमच वेळ असल्याचे सांगण्यात आले.
शिक्षा सुनावली, पुढे काय ?
भुसावळातील न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर एका महिन्याच्या आत हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाला कन्फर्मेशनसाठी सादर करावे लागेल व कन्फर्मेशन मिळाल्यानंतर आरोपीला उच्च न्यायालयात अपिलाची मुभा असेल व तेथेदेखील हीच शिक्षा कायम ठेवल्यास सर्वोच्च न्यायालयातही अपिलाचा अधिकार असेल व येथेदेखील शिक्षा कायम ठेवल्यास राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करण्याचा अधिकार आरोपीला असेल, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.



