पैशांच्या वादातून मित्रांनीच तरुणाला संपवत रेल्वे रूळावर फेकले
Over a monetary dispute, friends killed a young man and threw his body onto the railway tracks बीड (4 जून 2026) : पैशांच्या वादातून दोन मित्रांनी प्लॅन करीत तरुणाची मारहाण करीत हत्या केली व प्रकरण अंगावर न येण्यासाठी मृतदेह रेल्वे रूळावर टाकत आत्महत्येचा बनाव केला केला मात्र बीड पोलिसांनी हा बनाव उघडा पाडला. अफजलखान ऊर्फ तोहीद पठाण (36) असे खून झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव असून ऋषिकेश फड आणि गौरव व्यास अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
काय आहे प्रकरण
अफजलखान उर्फ तोहीद पठाण (36) हा तरुण परळी शहरातील सरदारनगर भागातील रहिवासी होता. मृत अफझलखान याने आपल्या कुटुंबाला मी मित्रांसोबत बाहेरगावी जात असल्याचे सांगून घर सोडले मात्र सलग दोन दिवस त्याचा कुटुंबीयांशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे कुटुंबीय चिंतेत होते. दोन दिवसांनंतर अचानक परळीतील लेंडेवाडी शिवारात असलेल्या रेल्वे रुळाच्या पटरीवर अफझलचा मृतदेह आढळल्यानंतर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
घातपाताचा सुरुवातीपासून संशय
सुरुवातीला घटनास्थळाची परिस्थिती पाहता हा रेल्वे अपघात किंवा आत्महत्येचा प्रकार असावा असंच चित्र दिसत होतं. परंतु, परळी पोलिसांना हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय आला. त्यांनी तातडीने गुप्त माहिती मिळवून तपासाची चक्रे गतिमान केली. पोलिसांनी संशयाच्या आधारे अफझलचे जवळचे मित्र ऋषिकेश फड आणि गौरव व्यास या दोघांना ताब्यात घेतले. सुरुवातीला या दोन्ही आरोपींनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर दोन्ही संशयितांना खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हा कबुल केला.
दगडाने ठेचून संपवलं
आरोपी ऋषिकेश फड आणि गौरव व्यास यांचा अफझलसोबत पैशांच्या देवाण-घेवाणीवरून जुना वाद सुरू होता. याच पैशांच्या कारणावरून दोघांनी अफझलचा काटा काढण्याचा पूर्वनियोजित प्लॅन आखला होता. बाहेरगावी नेण्याच्या बहाण्याने दोघांनी अफझलला गाठलं आणि निर्जन स्थळी नेऊन त्याच्या डोक्यात व अंगावर दगडाने जबर मारहाण करून त्याचा निर्घृण खून केला. हत्या केल्यानंतर हा खून नसून अपघात किंवा आत्महत्या आहे असं भासवण्यासाठी दोघांनी मिळून अफझलचा मृतदेह लेंडेवाडी शिवारातील रेल्वे रुळावर आणून फेकला आणि तिथून पळ काढला.



