सुरक्षा संच वाटपासाठी शंभर रुपयांची लाच भोवली : सामनेरची महिला जळगाव एसीबीच्या जाळ्यात
कारवाईने लाचखोर हादरले : संबंधित एजन्सी चालक एसीबीच्या रडारवर
गणेश वाघ
₹100 Bribe for Distribution of Safety Kits Proves Costly: Woman from Samner Caught in Jalgaon ACB’s Trap भुसावळ (4 जून 2026) : भुसावळ (4 जून 2026) : महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागांतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनेंतर्गत लाभार्थीला अत्यावश्यक संच व सुरक्षा संच वाटप करताना शंभर रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना भाग्यश्री विजय पाटील (20, सामनेर, ता.पाचोरा) यांना जळगाव एसीबीने अटक केली आहे. या कारवाईने लाचखोर हादरले असून आता संबंधित एजन्सी चालक एसीबीच्या रडारवर आहे.
असे आहे लाच प्रकरण
एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील एका बांधकाम कामगाराने अत्यावश्यक संच व सुरक्षा संच मिळविण्यासाठी ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यानुसार त्याला वावडदा (ता.जळगाव) येथे संच स्वीकारण्यासाठी बोलावण्यात आले होते. तेथे संच वाटप केंद्रावर कार्यरत असलेल्या भाग्यश्री विजय पाटील (20, रा.सामनेर, ता. पाचोरा, जि.जळगाव) यांनी लाभार्थीकडून केवायसी प्रक्रियेसाठी आवश्यक दोन फॉर्म विकत घेण्याच्या नावाखाली 100 रुपयांची मागणी केली मात्र शासनाच्या नियमांनुसार अत्यावश्यक संच व सुरक्षा संच लाभार्थींना विनामूल्य दिले जातात त्यामुळे संबंधित लाभार्थीने याबाबत जळगाव एसीबीकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने गुरुवारी दुपारी चार वाजता दवावडदा, ता.जळगाव येथे सापळा रचला. आरोपी महिला भाग्यश्री पाटील यांनी तक्रारदाराकडून 100 रुपयांची लाच स्वीकारण्यास संमती दर्शवून ती प्रत्यक्ष स्वीकारली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने तिला रंगेहाथ ताब्यात घेतले.
27 हजारांची रोकड जप्त
यावेळी एसीबीने झेरॉक्स मशीनजवळील स्टीलच्या डब्यातून एकूण 26 हजार 770 रुपयांची रोकड जप्त केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 मधील कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक रेशमा अवतारे, सुरेश पाटील, बाळू मराठे, राकेश दुसाने आदींच्या पथकाने यशस्वी केला. तपास पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे करीत आहेत.
लाचखोरांविरोधात करा तक्रार
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही शासकीय कर्मचारी अथवा संबंधित व्यक्ती कामासाठी लाचेची मागणी करत असल्यास तत्काळ एसीबीशी संपर्क साधावा.



