राज्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा : अपात्र प्रस्तावांची होणार फेरतपासणी ; महसूलमंत्र्यांची ग्वाही
अमरावती (5 जून 2026) : राज्यातील 80 लाखांवर लाडक्या बहिणी योजनेतून अपात्र झाल्याने त्यांच्यात रोषाचे वातावरण आहे तर विरोधकांनी या प्रश्नी सरकारला खडे बोल सुनावले आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा केली आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेतील अपात्र ठरलेल्या प्रस्तावांची आता फेरतपासणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगत सरकारने एक समिती गठीत केल्याचे म्हणत पात्र महिलांना त्यांचे लाभ मिळतील, अशी ग्वाहीदेखील दिली आहे.
या योजनेत मोठ्या संख्येने महिला अपात्र ठरल्याने त्यांच्या प्रस्तावांची फेरतपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यभरात सुमारे 80 लाख महिलांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यातील नेमका आकडा अद्याप स्पष्ट नसला तरी, तो काही लाखांमध्ये असण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
योजना सुरू झाली तेव्हा अमरावती जिल्ह्यातून सुमारे आठ लाख महिलांनी अर्ज केले होते. त्यापैकी सहा लाख 50 हजार महिलांना सुरुवातीला पात्र ठरवून त्यांना दरमहा दिड रुपये दिले जात होते. मात्र, दरम्यानच्या काळात ’केवायसी’ प्रक्रिया आणि सखोल तपासणी करण्यात आली, ज्यात अनेक महिला अपात्र ठरल्या.
यामुळे अनेक महिलांनी आपण पात्र असूनही अपात्रतेच्या यादीत कसे आलो, असा प्रश्न उपस्थित करत लोकप्रतिनिधींकडे विचारणा केली आहे. पालकमंत्र्यांनी फेरतपासणीची ग्वाही दिली असली तरी, सरकारने स्थापन केलेली समिती कधीपासून काम सुरू करणार, फेरतपासणी किती दिवसांत पूर्ण होईल आणि गोठवलेले लाभ पूर्ववत कधी मिळतील, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.


