विवाहितेवर बलात्कार : पाचोरा पोलिसात संशयीताविरोधात गुन्हा


पाचोरा (5 जून 2026) : प्रेमाचे आमिष दाखवत तसेच जीवे मारण्याची व समाजात बदनामी करण्याची धमकी देत विवाहितेवर वारंवार बलात्कार करण्यात आला. ही घटना पाचोरा तालुक्यात घडली. या प्रकरणी पाचोरा पोलिसात एकाविरोधात बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

काय आहे प्रकरण ?
पीडित महिलेच्या फिर्यादीवरून अनिल प्रकाश महाजन (रा. बांबरूड (राणीचे), ता. पाचोरा, जि. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, ऑक्टोबर 2025 ते मार्च 2026 या कालावधीत आरोपीने पीडित महिलेशी जवळीक साधत तिच्यावर प्रेम असल्याचे सांगितले. तू मला खूप आवडतेस, तुझ्या पतीला सोडून माझ्यासोबत ये, असे सांगून आरोपीने महिलेचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विविध ठिकाणी नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

पीडित महिलेने या प्रकाराबाबत कोणालाही माहिती दिल्यास जीवे मारण्याची तसेच समाजात बदनामी करण्याची धमकी आरोपीकडून देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे भीतीपोटी महिलेने दीर्घकाळ तक्रार केली नसल्याचे समजते.

या प्रकरणी पाचोरा पोलिसात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. प्राथमिक तक्रार अन्य पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आल्यानंतर ती ऑनलाइन पद्धतीने पाचोरा पोलिसांकडे वर्ग करण्यात आली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !