जामनेरात बोगस एचटीबीटी बियाण्यांचा सव्वानऊ लाखांचा साठा जप्त
1016 बियाण्यांची पाकिटे जप्त : चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
Stock of spurious HTBT seeds worth ₹9.25 lakh seized in Jamner भुसावळ (5 जून 2026) : पावसाळा तोंडावर आल्यानंतर शेतकर्यांची हंगामाची लगबग सुरू असतानाच शेतकर्यांच्या अजाणतेचा फायदा घेत बोगस एचटीबीटी बियाणे विक्रीसाठी आणण्यात आल्याची माहिती पोलीस यंत्रणेला कळाल्यानंतर छापेमारी करीत एक लाख 95 हजार 846 रुपये किंमतीची दोन हजार 16 पाकिटे जप्त करण्यात आली. ही कारवाई जामनेर शहरातील एका घरगुती गोदामावर छापा टाकून करण्यात आली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या कारवाईने परराज्यातून बोगस बियाणे आणून विक्री करणार्यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
जामनेर शहरातील वाकी रोडवरील साईनगर परिसरात राहणारा आरोपी दीपक राजमल चौधरी हा आपल्या घरामध्ये बेकायदेशीररित्या एचटीबीटी कापूस बियाण्यांचा मोठा साठा करून ठेवत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेंकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने गुरुवारी रात्री उशिरा छापा टाकला. छाप्यात घरातील एका खोलीतील 40 गोण्यांमध्ये ठेवलेली दिया 59 व क्रिश 45 या वाणांची दोन हजार 16 पाकिटे आढळल्याने ती जप्त करण्यात आली. या बियाण्यांची बाजारमूल्य सुमारे एक लाख 95 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
विक्रीसाठी बियाणे आणल्याची कबुली
तपासादरम्यान जप्त बियाण्यांचे उत्पादक म्हणून ‘गोल्ड किंग बायो जीन्स प्रा. लि., अहमदाबाद’ तर विक्रेता म्हणून हरियंत बियाणे स्टोअर्स, कोठाळे यांचे नाव आढळून आले. संबंधित बियाण्यांच्या खरेदी-विक्रीबाबत कोणतेही वैध परवाने, बिले अथवा अधिकृत कागदपत्रे उपलब्ध नसल्याने संशय अधिक बळावला. दीपक चौधरीने ही बियाणे गुलाब आधार पाटील व भूषण पाटील, तुकाराम कोळी यांच्या मदतीने पिंपरी, ता.धरणगाव परिसरातील शेतकर्यांना विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली.
चौकडीविरोधात गुन्हा दाखल
या प्रकरणी बियाणे निरीक्षक राजू केळ्याम हेपले यांच्या फिर्यादीवरून दीपक चौधरी (साईनाथ नगर, जामनेर), गुलाब आधार पाटील (वर्डी, ता.चोपडा), भूषण पाटील (वर्डी, ता.चोपडा), तुकाराम कोळी (चोपडा) यांच्याविरुद्ध जामनेर पोलिसात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रमाणित बियाण्यांची करा खरेदी
दरम्यान, बेकायदेशीर व प्रतिबंधित बियाण्यांच्या विक्री व साठवणुकीविरोधातील कारवाया पुढेही सुरू राहणार असून शेतकर्यांनी केवळ अधिकृत व प्रमाणित बियाण्यांचीच खरेदी करावी, असे आवाहन जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी केले आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, पाचोरा उपअधीक्षक बापू रोहोम, प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक प्रशांत दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड, एपीआय प्रमोद वाघ, हेमंत पाटील, ईश्वर पाटील, राहुल महाजन आदींच्या पथकाने केली.




